पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने बीव्हीजी फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी २०२६ दरम्यान संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ग्रामीण रुग्णालये (RH), प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), आयुष्मान आरोग्य केंद्रे तसेच विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फर्स्ट रिस्पॉन्डर (First Responder), बेसिक लाइफ सपोर्ट (BLS), कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (CPR) आणि गुड समॅरिटन ॲप जनजागृती विषयावरील विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
याशिवाय, अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजय कबाडे, प्रशांत इंगळे आणि मुजावर यांच्या समन्वयातून वारी बंदोबस्तासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही प्रथमोपचार, CPR आणि गुड समॅरिटन ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाची तात्काळ प्रतिसाद क्षमता अधिक बळकट झाली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश 'गोल्डन अवर' संकल्पनेनुसार रुग्णाला वेळेत प्रथमोपचार उपलब्ध करून देणे, प्रशिक्षित प्रथम प्रतिसादकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करणे आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी करणे हा होता.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रभर आजपर्यंत ४०,००० हून अधिक नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी आषाढी वारी कालावधीतच ३,००० हून अधिक आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणादरम्यान गुड समॅरिटन ॲपची सविस्तर माहिती देण्यात आली. हे ॲप आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण आणि मदत करणारा प्रथम प्रतिसादकर्ता (Responder) या दोघांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एखादी दुर्घटना किंवा वैद्यकीय आपत्कालीन घटना घडल्यास ॲपद्वारे जवळील प्रशिक्षित गुड समॅरिटन स्वयंसेवकांना तत्काळ सूचना (Alert) पाठविल्या जातात. तसेच रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्वतःचे अचूक लाईव्ह लोकेशन शेअर करता येते. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत आवश्यक प्रथमोपचाराच्या सूचना ॲपवर उपलब्ध असल्याने रुग्णाला योग्य स्व-देखभाल (Self Care) करता येते.
प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपला अनुभव सांगताना नमूद केले की, "वारीच्या काळात प्रचंड गर्दीमुळे अनेकदा मोबाईल नेटवर्कवर व्हॉईस कॉल लागत नव्हते. अशा परिस्थितीत मी गुड समॅरिटन ॲपद्वारे आपत्कालीन घटना नोंदविली आणि वेळेत मदत मिळाली. त्यानंतर मी १०८ जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधून आभार व्यक्त केले. त्या क्षणी मला एकच भावना झाली—हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये असल्यामुळेच वेळेत मदत मिळू शकली."
बीव्हीजी फाऊंडेशन, टाटा मोटर्स लिमिटेड आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारी मार्गावर आरोग्य कर्मचारी, पोलीस दल आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांचे प्रभावी प्रथम प्रतिसाद जाळे निर्माण झाले असून, भविष्यात राज्यभर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक जलद, परिणामकारक आणि जीवनरक्षक मदत उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे.

