वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असून, माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोणतेही विकासकाम निधीअभावी रखडू दिले जाणार नाही, असा ठाम विश्वास स्वराज साखर कारखान्याच्या चेअरमन तथा सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी वेळापूर-शेरी येथील भाजपचे कार्यकर्ते तथा श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने-देशमुख व वेळापूर विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सौ. नीलम अमृतराज माने-देशमुख, सौ. वैष्णवी अमरसिंह माने-देशमुख आणि सौ. अदिती अभयसिंह माने-देशमुख यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान केला.
प्रास्ताविकात श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने-देशमुख यांनी राज्य सरकारच्या विविध जनहिताच्या योजनांचा आढावा घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफी, साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांच्या वीजबिलांबाबत दिलेला दिलासा, तसेच ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रभावी काम सुरू असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच माने-देशमुख परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदिच्छा भेटीच्या निमित्ताने विकास, संघटनात्मक बळकटी आणि जनहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

