सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
"उक्ती आणि कृतीतून आदर्श घडविणारी व्यक्तिमत्त्वे समाजासाठी मार्गदर्शक ठरतात. 'रयत'चा विद्यार्थी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे ऋण फेडणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे लोकाभिमुख असून समाजासाठी आदर्शवत आहे," असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते, तर ज्येष्ठ पत्रकार व लेखक मधुकर भावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकर भावे म्हणाले, "रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून रयत शिक्षण संस्थेसारख्या मातृसंस्थेने आपल्या विद्यार्थ्याचा केलेला सन्मान आहे. स्वतःची शैक्षणिक संस्था असतानाही मी 'रयतचा राम' हे ब्रीद जपत रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने योगदान देत आहेत. संस्थेच्या 'कमवा आणि शिका' योजनेत खडी फोडणाऱ्या रामशेठ यांनी आज त्या खडीचे डॉलर केले आहेत," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले, "रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विचारांशी आणि कार्याशी कायम निष्ठा ठेवत संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांचा गौरव करणे म्हणजे रयतच्या मूल्यांचा गौरव करण्यासारखे आहे."
या प्रसंगी आमदार विश्वजीत कदम यांनी रामशेठ ठाकूर यांच्याशी असलेले कौटुंबिक ऋणानुबंध व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. प्रा. संभाजी पाटील लिखित व शब्दबद्ध केलेल्या ‘शतायुषी शुभकामना’ या गीताद्वारे संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा अर्पण करण्यात आल्या. यावेळी रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्यावर आधारित ध्वनीचित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच मधुकर भावे लिखित ‘रामशेठ नाबाद ७५’ आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संपादित ‘अमृतपर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रयत शिक्षण संस्था पेपरलेस होणार
प्रशासकीय कामकाजाचे सुलभीकरण करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेमार्फत 'राईज' RISE हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शाळा सोडल्याचा दाखला देईपर्यंतचे सर्व प्रशासकीय कामकाज आता या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पेपरलेस होणार आहे.
अभिष्टचिंतनाला उत्तर देताना रामशेठ ठाकूर म्हणाले, "सन १९६४ पासून माझा रयत शिक्षण संस्थेशी संबंध आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतलेला प्रवेश हा माझ्या आयुष्यातील कलाटणी देणारा प्रसंग ठरला. रयतेमुळेच माझे व्यक्तिमत्त्व घडले असून या संस्थेचा मी सदैव ऋणी राहीन."
उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले. ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी रामशेठ ठाकूर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले, तर माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन समारंभास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल व साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एम. बी. शेख, अरुण कडू पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, अंकुश काकडे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ वर्कर्स, लाईफ मेंबर्स, विविध शाखांचे शाखाप्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी, सातारा शहरातील शिक्षणप्रेमी नागरिक, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


