डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
दिव्यांग प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत पत्रकार उत्कर्ष समितीने पुढाकार घेत डोंबिवली रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस विभागाकडे निवेदन सादर केले. समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व प्रदेश संघटक गुरुनाथ तिरपणकर यांनी दिव्यांग बांधवांसह संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडल्या.
पत्रकार उत्कर्ष समिती ही पत्रकारांच्या हितासाठी कार्य करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सर्व स्तरांतील घटकांच्या प्रश्नांसाठीही सातत्याने प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेच्या स्थानिक गाड्यांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनेक सक्षम नागरिक प्रवास करत असल्याने दिव्यांग प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली होती.
दिव्यांग बांधव सचिन गरुड, पुष्कर चिंवडकर आणि गुलाब आव्हाड यांनी रेल्वे प्रवासात येणाऱ्या समस्यांबाबत डॉ. अशोक म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत डॉ. म्हात्रे यांनी मागील आठवड्यात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
याच अनुषंगाने आज डोंबिवली येथील रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. दिव्यांग प्रवाशांना राखीव डब्यांमध्ये प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी पाल व तुळे यांनी दिव्यांगांसाठी राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांसाठी पत्रकार उत्कर्ष समितीने घेतलेल्या या पुढाकाराचे दिव्यांग बांधवांनी स्वागत केले असून, रेल्वे प्रशासनाने याबाबत प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


