पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत
भंडीशेगाव येथील सोपानकाका पालखी तळ 30 जून पर्यंत सुयोग्य करावा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले म्हणाल्या, पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या वाढीव जागेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. पालखीतळावरील अतिक्रमणे काढून घ्यावीत. पालखी तळांवर हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवावी. श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला भंडीशेगांव येथील पालखी तळावरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करून 30 जून पर्यंत जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी सपाटीकरण व मुरमीकरण करून पालखीतळ स्वच्छ व सुयोग्य करावा, सर्व आवश्यक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त शीतली उगले यांनी दिल्या.
तसेच पालखी तळांवर कायमस्वरुपी सुविधा देण्याबाबत पालखीसोहळा प्रमुखांशी चर्चा करुन नियोजन करावे. वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेबरोबर तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. 65 एकर येथे प्रशासनाकडून दिंड्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येते. दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने जागा अपुरी पडत असेल तर पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, पालखी मार्ग व तळांवर सुविधा बाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देवून ती कामे पुर्ण करण्यात येत आहेत. पालखी सोहळे जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सर्व भाविकांना, पालखी मार्ग व तळांवर आवश्यक सुविधा प्रशासनकडून उपलब्ध केल्या जातील असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर व तळांवर प्रशासकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी मार्ग व तळांवर जिल्हापरिषदेमार्फत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्नानगृह, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली.
पालखी सोहळ्या बरोबर दिवसेंदिवस दिंड्यांची तसेच वारकरी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व उपलब्ध असणारे पालखीतळ सद्यस्थितीत कमी पडत असल्याने पालखी तळास वाढीव जागा मिळावी, तसेच जर्मन हँगरची संख्या वाढवावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजन दास, पालखी सोहळा प्रमुख ॲड.राजेंद्र उमाप यांनी यावेळी केली.
यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांनी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी येथील पालखीतळांची पाहणी केली. तसेच मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.

.jpeg)
