माढा प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या ज्वलंत असणारा लाईटचा प्रश्न घेऊन आज सोलापूर येथे महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री.सुनिल माने साहेब यांची आमदार अभिजीत पाटील यांनी भेटून माढा मतदारसंघ व नदीकाठच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने नियोजित सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी भेटून निवेदन दिले..
माढा मतदार संघ, नदीकाठची गावे वषसोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध पिकांची लागवड, पाणी व्यवस्थापन व सिंचनाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून शेती व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
तसेच अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना नियमानुसार ८ तास वीजपुरवठा अपेक्षित असताना केवळ ६ तासच वीजपुरवठा मिळत आहे. तोही अनेक वेळा कमी दाबाने अथवा खंडित स्वरूपात मिळत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी ऊस, डाळिंब, भाजीपाला, फळबागा तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी उष्णतेचे प्रमाण जास्त असून भूजल पातळीही घटलेली आहे. त्यामुळे शेतीसाठी विजेवर चालणाऱ्या पंपांवर शेतकऱ्यांचे संपूर्ण अवलंबित्व आहे. वीजपुरवठा कमी कालावधीसाठी किंवा बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल.
तरी आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याबाबत जारी करण्यात आलेला आदेश तात्काळ रद्द करावा. तसेच सध्या दिला जाणारा ६ तासांचा वीजपुरवठा हा अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन सांगितले.


