पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अधिकमास कालावधीत राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे हजेरी लावत मोठ्या श्रद्धेने रोख देणगी तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले. विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस एकूण रु. ९,४६,२८,२३३ इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
दि. १७ मे ते १५ जून या अधिकमास कालावधीत भाविकांकडून श्रींच्या चरणी रु. ८१,७२,६७९ अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे रु. २,०३,५५,१८०, लाडू प्रसाद विक्रीतून रु. ७२,३३,७००, भक्तनिवासातून रु. १,२५,५६,७२३, पूजाविधीमधून रु. ११,०३,४२७, हुंडीपेटीतून रु. २,५३,८२,३४४, सोने-चांदी अर्पणातून रु. १,७८,४३,१६७, तसेच फोटो विक्री, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी विविध माध्यमांतून रु. १९,८१,०१३ इतके उत्पन्न प्राप्त झाले.
तुलनात्मकदृष्ट्या, सन २०२३ च्या अधिकमासात श्रींच्या चरणी रु. ७३,९५,३५३, देणगी रु. १,५२,९०,३३५, लाडू प्रसाद विक्री रु. ८७,७३,३००, भक्तनिवास रु. १,००,५०,००९, पूजाविधी रु. २८,०५,७४१, हुंडीपेटी रु. २,२५,७०,४९१, सोने-चांदी अर्पण रु. ३३,१७,७४९ आणि इतर विविध माध्यमांतून रु. १७,३९,४५९ इतके उत्पन्न प्राप्त झाले होते.
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यंदाच्या अधिकमासात ५,३०,६२० भाविकांनी पदस्पर्श दर्शन, तर सुमारे ९,३०,०६८ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.
सन २०२३ च्या अधिकमासात मंदिरे समितीस रु. ७,१९,४२,४३७ इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा ते वाढून रु. ९,४६,२८,२३३ इतके झाले असून, मागील अधिकमासाच्या तुलनेत रु. २,२६,८५,७९६ इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे.
या उत्पन्नातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांना अधिक चांगल्या आणि पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती सातत्याने प्रयत्नशील राहील, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले.


