संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या संमतीशिवायच घरगुती व व्यापारी आस्थापनांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.या प्रकाराविरोधात संतप्त व्यापारी वर्गाने तातडीने ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे.
“स्मार्ट मीटर बसवताना आमची संमती घेतली जात नाही. सक्तीने मीटर बसवले जात आहेत. जुन्या मीटरपेक्षा बिल जास्त येण्याची भीती आहे,अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.स्मार्ट मीटर बाबत पुरेशी जनजागृती न करता, तांत्रिक माहिती न देता सक्ती केली जात असल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे.ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय कोणतेही नवीन मीटर बसवू नये.आधी जनजागृती करा, शंका दूर करा,त्यानंतरच पुढील कार्यवाही करा,” अशी मागणी होत आहे.
स्मार्ट मीटरमुळे रीडिंगमध्ये अचूकता येईल,वीजचोरी थांबेल असा वीज कंपनीचा दावा असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र “हे मीटर म्हणजे बिलाचा शॉक देणारे मीटर आहेत” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.संतप्त व्यापारी वर्गाने थेट तहसीलदारांकडे व ग्राहक संरक्षण समिती कडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात येणार असून तातडीने ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर योजना ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही महावितरणकडून ग्राहकांना मोबाइल संदेश पाठवून विद्यमान मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सूचना दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक भागांत स्मार्ट मीटर मधील तांत्रिक त्रुटींमुळे वाढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी समोर आल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी महावितरण कार्यालयांकडे धाव घेतली असून, तरीही पूर्वसंमतीशिवाय जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्या अथवा अधिक माहिती विचारणाऱ्या ग्राहकांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप विज ग्राहकांमधून होत आहे. शासनाकडून स्मार्ट मीटरसंदर्भात कोणते परिपत्रक जारी करण्यात आले असल्यास ते सार्वजनिक करावे अशी मागणी जोर धरत आहे.यावेळी दत्तात्रय गुळवे,आनंद शहाणे,भरतेश वैद्य,प्रथमेश जठार,दीपक सुत्रावे,विजय गुळवे,सरदार तांबोळी आदी व्यापारी उपस्थित होते.


