भरीव मदतीची आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदूळवाडीजवळ म्हसवड–पंढरपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात देवदर्शन करून परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील बावचे आणि सातोरे कुटुंबियांच्या पिकअप वाहनाचा रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून ५ महिला आणि ३ मुलांसह एकूण ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ७ जण जखमी झाले होते. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपूर येथील इसबावी परिसरातील बावचे कुटुंबीय तसेच जुना कासेगाव रोड येथील सातोरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बावचे आणि सातोरे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायी असून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने संबंधित महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे सर्व्हिस रोड, उड्डाणपूल, संरक्षक भिंती, सुरक्षा कठडे उभारणे, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरी बुजविणे तसेच इतर सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात. विशेषतः या अपघातास कारणीभूत ठरलेली रस्त्यालगतची विहीर तात्काळ बुजविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या दुर्घटनेबाबत जबाबदारी निश्चित करून संबंधित कंत्राटदार आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत अपुरी असून मृतांच्या कुटुंबीयांना अधिक भरीव आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत व नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांना धीर मिळावा आणि शासनाने त्यांच्यासोबत संवेदनशीलतेने उभे राहावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, मनोज यलगुलवार, संदीप शिंदे, अमर सूर्यवंशी, सादिक मुलानी, महेश अधटराव, बाबासो ताड यांच्यासह इतर नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते


