भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड येथून देवदर्शन करून पंढरपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या टमटम वाहनाचा रविवारी भीषण अपघात झाला. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या काठोकाठ पाण्याने भरलेल्या विहिरीत वाहन कोसळल्याने 5 महिला, एका 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. मात्र, या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कारण सुमारे 10 वर्षांपूर्वी याच ठिकाणी असाच एक भीषण अपघात झाला होता.
नेमकं काय घडलं होतं ?
स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे दशकापूर्वी याच तांदूळवाडी परिसरात जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाळवणी येथील कलाकार मंडळींच्या जीपला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त झाली होती. मात्र, त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करणारा अपघात पुन्हा घडल्याने स्थानिक नागरिक हादरले आहेत.
आता 8 जणांचा मृत्यू
रविवारी म्हसवड-पंढरपूर महामार्गावर तांदुळवाडीजवळ भीषण अपघात घडला. पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक मिळून 14 जण एका टमटम मधून देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, तांदुळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टमटम थेट रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला स्थानिकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने टमटम वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. जखमी व मृतांना तातडीने पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

