बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
बार्शी तालुका पोलिसांनी अवैध व्यवसायांवर सुरू असलेल्या धडक मोहिमेत मोठी कारवाई करत बार्शी-लातूर रोडवरील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ७२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग व नाकाबंदी सुरू असताना, दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर रोडवरील ‘लवंगी मिरची’ कला केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने धाड टाकली असता कला केंद्र सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी तेथे नृत्यांगना, ग्राहक, चालक व मालक अशा एकूण ७२ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, विविध साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ५०,१३,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व सहपोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे तसेच पोलीस कर्मचारी धनराज केकाण, डुकळे, स्वाती काटे, राहूल बोंदर, बिरकले, कांबळे, चौधरी व चालक खराडे यांनी सहभाग घेतला.


