पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह. कवठेकर प्रशालेत मार्च २०२६ माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. नानामालक कवठेकर, मानद सचिव गुरुवर्य श्री. एस. आर. पटवर्धन सर, पदाधिकारी श्री. एस. पी. कुलकर्णी सर, डॉ. मिलिंद जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ. रा. ज. व्हनमाने, प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. जे. एम. शेलार सर तसेच शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेतील प्रशालेचा ९४ टक्के निकाल आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणवत्तेची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा, हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये चि. अथर्व अमित वाडेकर (१००%), कु. सान्वी सचिन कलढोणे (९९.६०%), चि. सार्थक सिद्धेश्वर लेंगरे (९९.२०%), कु. धनश्री राहुल लिगाडे (९७.४०%) आणि कु. सई महेश तेंडुलकर (९७.२०%) यांचा समावेश होता.
सत्कारप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या यशामध्ये द. ह. कवठेकर प्रशालेचे आणि शिक्षकांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले.
संस्थेचे मानद सचिव गुरुवर्य श्री. एस. आर. पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबाबत मार्गदर्शन करताना सातत्य, परिश्रम आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. एम. कुलकर्णी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री. समीर दिवाण सर यांनी केले.


