सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्था, सातारा येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की संस्थेचे पदाधिकारी, विधिमंडळाचे सभासद, संसदेचे सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी, रयतच्यासंबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू-भगिनी आणि तरुण मित्रांनो..
दरवर्षी ०९ मे ला आपण इथं एकत्रित येत असतो. वर्षभरामध्ये काय केलं? कुठं कमी पडलो? आणि नवीन काय करणार आहोत? याची मांडणी सविस्तर चर्चा करून आजच्या दिवशी ही केली जात असते. मला आनंद आहे की, दिवसेंदिवस हे काम आपलं वाढतंय. कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने, दूरदृष्टी ठेवून आणि समाजाच्या शेवटच्या लहान कुटुंबात असलेल्या मुला-मुलींना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत; यासाठी आपलं आयुष्य दिलं. तोच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
आज संस्थेचा विस्तार वाढला. जवळपास एकंदर ज्या शाखा आहेत त्याची संख्या ही ७४२ इतकी आहे. या शाखांमध्ये ४ लाख १८ हजार मुलं शिकत असतात. ११ हजार ६३३ अध्यापक वर्ग हा संस्थेमध्ये ज्ञान देण्याचं काम करत असतो. वैशिष्ट्य हे आहे की, हे सगळे रयतसेवक प्रामाणिकपणाने संस्थेसाठी अखंड काम करत असतात. आज या संस्थेची उंची वाढली, विस्तार वाढला, अनेक क्षेत्रांमध्ये योगदान झालं. याचं श्रेय हे देत असताना यातला फार मोठा वाटा हा सेवकांचा आहे आणि म्हणून मी या सगळ्या सेवकांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.
दरवेळेला काही ना काहीतरी नवीन पॅटर्न आपण घेत असतो. आपल्याला आठवत असेल याच्या आधीच्या बैठकीमध्ये मी आग्रह केला होता की, आता जग बदलतंय. जगामध्ये वेगळे विचार येतायत. एक नवीन संकल्पना जगाने स्वीकारली आणि ती संकल्पना ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)' ही आहे. त्याच्यापासून रयतेला मागे राहून चालणार नाही. मी श्री. दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की, यासंबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेड्यापाड्यातली मुलं-मुली आज 'एआय'च्या संबंधी चर्चा करायला लागली. त्यासंबंधीची त्यांची मतं द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल? यासंबंधीचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागली.
दरवर्षी आपण शिष्यवृत्त्या हा कार्यक्रम नेहमी घेतो. तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडणं देणगी, अशी देणगी संस्थेला २५ कोटी रुपये एवढी मिळालेली आहे. या सगळ्यात दानशूर दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचे मी अंत:करणापासून अभिनंदन करतो. त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारे प्रोत्साहित करण्याची भूमिका ही या ठिकाणी केली. क्रीडाक्षेत्र असो, अन्य क्षेत्र असो. प्रत्येक ठिकाणी रयतेचं ध्वज हा फडकेल, याची काळजी त्यांनी घेतली.
एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की, अलीकडे जगातल्या काही महत्वाच्या विद्यापीठांचा आणि रयतेचा एक संबंध वाढला पाहिजे, नातं वाढलं पाहिजे. त्यादृष्टीने प्रा. नलावडे यांनी आत्ताच तुमच्यापुढे माहिती दिली. त्यांना इंग्लंड, अमेरिकेला पाठवलं होतं आणि सुदैवाने जगातल्या चांगल्या संस्थांमध्ये त्यांना सुसंवाद साधता आला. त्याच संस्थेच्या मदतीने इथे काही नवीन प्रोसेस ही सुरू करण्याच्याबद्दलची प्राथमिक चर्चा ही झालेली आहे. संस्थेचे पदाधिकारी विशेषतः श्री. दिलीपराव पाटील, श्री. भगीरथ शिंदे आणि श्री. दळवी, अन्य या क्षेत्रात बांधलेले या लोकांना आणि हे जे परदेशातल्या संस्था आहेत, त्याच्या प्रमुखांना निमंत्रित करून एक 'संयुक्त बैठक' ही आपण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये 'रयत' आणि 'बोस्टन युनिव्हर्सिटी' असेल, 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी' असेल, अन्य विद्यापीठ असतील. यांच्याशी सुसंवाद कसा करता येईल? आणि याचा लाभ आमच्या मुला-मुलींना कसा होईल? याची खबरदारी आपण घेणार आहोत. हे सगळे कार्यक्रम घेऊन आपण पुढे जायचंय. तुम्हा सगळ्यांची साथ, पाठिंबा यामुळेच हे शक्य आहे आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो.
मी रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख दरवर्षी करत असतो. दरवर्षी काही ना काही कोटी रुपये ते संस्थेला देत असतात. यंदा ३ कोटी आतापर्यंत पोहोचलेत, अजून वर्ष जायचंय. त्यामुळे प्रत्येक कामाला त्यांची साथ आहे, अनेकांची साथ आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्याने आपण हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल? आणि इथे उत्तम आदर्श नव्या पिढीकडे, सेवकांकडे कसा जाईल? याची सामुदायिक काळजी घेऊ, एवढेच या ठिकाणी सांगतो.
धन्यवाद!
जय हिंद, जय भारत!


