राज्य अन्न आयोगाच्या सांगली दौऱ्यात १५६ शिधापत्रिकांचे वितरण विधवा , परीतक्ता , वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, अपंग दुर्धर आजार ग्रस्त , शेतमजूर, वीट भट्टी कामगार अशा कुटुंबाला मिळाला लाभ.
सांगली प्रतिनिधी प्रमोद क्षीरसागर तेज न्यूज
राज्य अन्न आयोगाने अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक १६, १७ व १८ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्याचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये अन्न आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी शोधून त्यांना शिधापत्रिका वितरणाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.
जिल्ह्यातील ६८३ लाभार्थ्यांना एकूण १५६ शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अपंग व्यक्ती, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, वीट भट्टी कामगार, शेतमजूर, विधवा आणि परित्यक्ता महिला तसेच इतर गरजू लाभार्थ्यांचा समावेश होता.
वितरित करण्यात आलेल्या शिधापत्रिकांमध्ये अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब (PHH) या दोन्ही प्रकारच्या शिधापत्रिकांचा समावेश असून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना अन्नसुरक्षेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.


