मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होतात. यादरम्यान बालविवाहांचे प्रमाणही लक्षणीय असते. हे बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करावी. यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करावे. तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करावी.
बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा. मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होईल.
बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा डायल ११२ वर द्यावी. बाल विवाह रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांना यासाठी सहकार्य करावे - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

