मुंबई प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
मेघवाडी–लालबाग येथील बाल विकास मंडळाच्या वतीने ६८ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दिनांक ६ मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत व ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
सन १९५२ साली स्थापन झालेल्या या मंडळामार्फत दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावेळी ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांनी कोकणी शैलीत शिवरायांप्रती काव्यात्मक भावना व्यक्त करत बाल विकास मंडळ, मेघवाडी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, शौर्य व दूरदृष्टी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सन १९५२ मध्ये स्थापन झालेले बाल विकास मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवत आहे. मंडळाच्या कार्याला संस्थापक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आप्पा तोडणकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.
मंडळाच्या सदस्यांचे समर्पण व स्थानिक नागरिकांचे मिळणारे सहकार्य यामुळे मंडळाची सामाजिक वाटचाल अधिक बळकट होत असल्याचा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य राजेंद्र तोंडवळकर, भाई सुर्वे, भाऊ पाताडे, अक्षय माळकर, अशोक भोसले, दिलीप देसाई, संजू सुतार, बापू शेडगे, धोंडीराम सावंत, मिलिंद बर्डे, प्रथमेश पालव, अजिंक्य नकाशे, स्वप्निल पाताडे, सिद्धेश तोडणकर तसेच अनेक मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून समाजात स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत राहावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

