पंढरपूर आषाढी वारी प्रतिनिधी सूर्यकांत भिसे तेज न्यूज
पुण्याच्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची अपुरी जागा , संतांच्या दर्शनासाठी होणारी पुणेकरांची गर्दी या सर्व गोष्टींचा विचार करुन यंदा भवानी पेठेतील मुक्कामाची जागा बदलण्याचा निर्णय दिंडी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम रद्द करुन एक मुक्काम वडकी नाला येथे घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे , लोणंद , नातेपुते , माळशिरस व वेळापूर येथील पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या जागेबाबत संस्थान व दिंडी समाजाने अडचणी मांडल्या .
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे म्हणाले , गतवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात भवानी पेठेत पोहोचल्यानंतर एकच गर्दी उसळली . त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवर दर्शनासाठी येणार होते . गर्दीमुळे दिंड्या पालखी जवळ पोहोचू शकल्या नाहीत . प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्थानकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला व जागतिक कीर्तीच्या दैदिप्यमान सोहळ्याची बदनामी झाली. देवस्थानाला अपमानास्पद वागणूक मिळाली अशा घटना वारंवार घडू नये यासाठी सोहळ्याच्या परंपरेला बाधा न येता प्रशासनाबरोबर चर्चा करुन भवानी पेठेतील मुक्कामाची जागा बदलावी . तसेच एस पी कॉलेज, टिळक रोड किंवा नेहरु स्टेडियम येथे पालखी मुक्कामासाठी जागा पहावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
वासकर दिंडीचे प्रमुख नामदेव महाराज वासकर म्हणाले , आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन टप्पे मोठे आहेत . गतवर्षी पुण्यात व सासवडला पोहोचायला रात्रीच्या ११ वाजले . पुण्यातील गर्दी व हडपसर ते दिवेघाट सुरु असलेले रस्त्याचे काम त्यामुळे दिंड्यांना वाटचालीत त्रास होतो . हा त्रास कमी करण्यासाठी पुण्यात पालखी एक दिवस मुक्कामी ठेवावी तर दुसरा मुक्काम वडाकीनाला येथे ठेवावा असा ठराव यावेळी करण्यात आला. त्यास दिंडी प्रमुख देवीदास ढवळीकर यांनी पाठिंबा दिला.
माऊलींचे यंदा ३ वाजता प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे परंपरेने सायंकाळी ४ वाजता प्रस्थान होते .
दरवर्षी प्रस्थान सोहळा उरकून दिंड्याना आपल्या जागेवर पोहोचायला उशीर होतो हे लक्षात घेता यंदा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता प्रस्थान करण्यात येईल असे यावेळी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर पवार यांनी सांगितले .
सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप म्हणाले , यंदा अधिक मासामुळे प्रस्थान सोहळा जुलै मध्ये होणार आहे. पावसाळ्याचे दिवस असतात . या सोहळ्यासाठी शासनाने निवारा शेड उभारावेत , लोणंद , नातेपुते , माळशिरस व वेळापूर येथील पालखी तळासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. सध्या पालखी सोहळ्याचे कच्चे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात पुन्हा जागेची पाहणी , मार्गातील बदल पाहून चैत्र वद्य एकादशीला योग्य तो बदल करुन कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात येईल .
या बैठकीस प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज लोंढे , ॲड रोहिणी पवार, सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, मानकरी विठ्ठल महाराज वासकर , नामदेव महाराज वासकर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , ॲड माधवी निगडे , मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर , दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, उपाध्यक्ष भाऊ फुरसुंगीकर , सचिव मारुती कोकाटे, खजिनदार एकनाथ महाराज हांडे , सदस्य देवीदास ढवळीकर, शाम उकळीकर , आबासाहेब चाकणकर , हरी लबडे, बाळासाहेब तांबेकर, गणेश कराडकर , रामभाऊ चोपदार यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते.

