पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा क्षेत्रात आपल्या मुला-मुलींना घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित “जिजामाता सन्मान पुरस्कार वितरण समारंभ – २०२६” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मातृशक्तीचा सन्मान, संस्कारांचा गौरव आणि कर्तृत्वाचा उत्सव या भावनेतून हा सोहळा कर्मयोगी सभागृह, अर्बन बँक, खवा बाजार, पंढरपूर येथे पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत डगळे (उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर), सीमाताई प्रशांतराव परिचारक (सामाजिक कार्यकर्त्या) व ज्ञानेश्वर म्याकल (प्रांतमंत्री, क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन लादे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी क्रीडा भारती ही संस्था राष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे कार्यरत आहे, क्रीडा संस्कारातून राष्ट्रनिर्मितीचा संस्थेचा हेतू काय आहे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो कसा राबविला जात आहे याचे सविस्तर विवेचन केले. तसेच जिजामाता सन्मान पुरस्कार देण्यामागील प्रेरणा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तसेच आजच्या काळात अनेक माता आपल्या मुला-मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा मातांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जिजामाता सन्मान पुरस्कार दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यानंतर क्रीडा क्षेत्रात आपल्या मुला-मुलींना घडविणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या समारंभात अंजली समाधान आवताडे (मंगळवेढा), करुणा जनार्दन शिवशरण (घोडेश्वर–माचनुर), विद्या विनायक सरगुळे (करकंब) आणि खातून नौशाद जमादार (हुळजंती–उमदी) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना खातून नौशाद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मुलांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी कुटुंबाने घेतलेले कष्ट आणि मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान सर्व मातांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर म्याकल यांनी आपल्या भाषणात क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून देशभरात राबविण्यात येणारे विविध क्रीडा उपक्रम, त्यामागील राष्ट्रीय दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण झालेली यशस्वी उदाहरणे यांचा उल्लेख केला. क्रीडा क्षेत्रातून शिस्त, संघभावना आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्याचे कार्य क्रीडा भारती करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सीमाताई परिचारक यांनी आपल्या मनोगतात खेळाडू घडविण्यामागे पालक आणि विशेषतः मातांचे असलेले कष्ट, चिकाटी आणि जिद्द यांचे कौतुक केले. पुरस्कारार्थी मातांचे अभिनंदन करत त्यांनी खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा भारती, पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड आणि जिल्हा मंत्री रवी ओहोळ यांच्यासह ओंकार कापसे, प्रवीण देशपांडे, बाळकृष्ण डिंगरे, सुनील जगताप , तुकाराम खंदाडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सुधाकर जोशी, योगेश कुलकर्णी, राजेश दंडे रामेश्वर कोरे, रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वाडीकुरोलीच्या प्राचार्या डॉ. गीतांजली खाडे , कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवेचे प्राचार्य दास तसेच क्रीडाप्रेमी, पालक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी क्रीडा भारती पंढरपूर तालुका मंत्री म्हणून दत्तात्रय शिरसट यांची तसेच पंढरपूर शहर क्रीडा प्रमुख म्हणून सुनेत्रा नागणे यांची निवड जाहीर करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मातृशक्तीचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

