सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना ‘उत्कृष्ट कार्यालय प्रमुख’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथील मंत्रीमंडळ सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात हा गौरव प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर १०० पैकी ८० गुण मिळवत “विशेष-प्रशंसनीय” ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली आहे.
जिल्हा परिषदेने ज्येष्ठता सूची अद्ययावत करणे, पदोन्नती व सरळसेवा नियुक्ती प्रक्रिया, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्णता तसेच सेवापुस्तक अद्ययावत करण्यासारख्या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. विशेषतः १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे आणि प्रशिक्षण पूर्णतेत ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळवणे ही कामगिरी लक्षणीय ठरली.
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या सेवाकर्मी कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी केवळ सोलापूरपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही आदर्श ठरत आहे.
“महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. हा पुरस्कार सांघिक प्रयत्नांचे फलित असून पुढेही अशीच कामगिरी कायम ठेवू,” अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली.

