रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग हिरवा,
आपल्या मातीच्या नात्याचा.
फडकतोय तिरंगा अभिमानाने आज,
प्रजासत्ताक दिनाचा चढलाय साज
अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण अकलूज नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उत्कर्ष शेटे, मुख्याध्यापक अमोल फुले, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. अमोल माने, माता-पालक संघाच्या गायत्री शेटे यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करण्यात आले. विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्यवृंदाने दिलेल्या संगीतमय साथीनं कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे राष्ट्रीय महत्त्व विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडविलेल्या संविधानातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळतो, असे सांगितले. देश विविध क्षेत्रांत प्रगती करत असून महिलांचे योगदानही विकासात मोलाचे आहे, असे ते म्हणाले. विद्यालयाने कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रताप क्रीडा मंडळ आयोजित समूह नृत्य स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद तसेच संग्रामसिंह मित्र मंडळ आयोजित लेझीम स्पर्धेत मुला-मुलींच्या संघांनी शहरी गटातून प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत यश संपादन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. अमोल माने यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम असून संविधानाने देशाला एकता, न्याय व बंधुतेची शिकवण दिल्याचे सांगितले.
यानंतर एनसीसी, आरएसपी व स्काऊट पथकांनी बँडच्या तालावर नेत्रदीपक संचलन सादर केले. या संचलनाचे नेतृत्व विष्णू चोरमले याने केले. सामुदायिक कवायतींनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. हलगीच्या तालावर मराठी मातीचा सुगंध असलेला लेझीम खेळ सादर झाला. यानंतर देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आधारित ग्रामीण जीवन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत अनोखा राग है’ या आदिवासी गीताचे सादरीकरण झाले. कलाकारांच्या कला-क्रीडा गुणांचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले.
या कार्यक्रमास रात्र शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, पत्रकार, आजी-माजी पदाधिकारी, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, बलभीम काकुळे, कल्पना मोरे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा सरवदे व सीमा कुलकर्णी यांनी केले. ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा शेवट गोड झाला.

