पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर मध्ये संस्थापक सचिवा मा.सुनेत्राताई पवार सो यांच्या संकल्पनेतून आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत जीवन कौशल्य शाळा घेण्यात आली.
प्रशालेतील चौथीच्या वर्गाने स्वयंपाकाचे साहित्य आणून स्वयंपाक तयार करण्याचा अनुभव घेतला. पाच गटात झालेले या उपक्रमात मुलांनी घरून पीठ, मीठ, मसाले,तांदूळ भाजीचे साहित्य आणले होते. मैदानावरच्या लाकूड फाटा गोळा करून चुली पेटवल्या.
दररोज आयता डबा घेऊन येताना आईला किती कष्ट करावे लागतात याचा अनुभव मुलांनी घेतला. काहींची कणीक पात्र झाली तर काहींच्या भाकऱ्या तव्यापर्यंत जाईपर्यंत एकाच्या दोन-तीन वेळा झाल्या. मध्येच चूल विझल्याने धूर झाला. चूल फुकताना धुराचा त्रास झाला. पण एकदाचा स्वयंपाक तयार झाला तो मात्र अप्रतिम.
गटाने तयार केलेले बाजारआमटी,बटाट्याची भाजी,वांग्याची भाजी व पातळ पिठलं आणि मसाले भात सर्व काही पंक्तीत चांगला भाव खाऊन गेली. भाकरी आकाराने नव्हे पण चवीला छान झाल्या होत्या. दोन-तीन प्रकारचे भात करायला वेळ लागला पण थोड्याच वेळात फस्त झाला.
मुख्याध्यापक संतोष कवडे व वर्ग शिक्षक महेश भोसले यांनी सर्व गटांना स्वयंपाकाच्या सूचना केल्या. त्याचबरोबर अश्विनी गुमटे , सुवर्णा जगदाळे , राणी लाडे व जिजाबाई सोनटक्के यांनी मुलांना स्वयंपाक करण्यासाठी खूप मदत केली.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुलांना स्वयंपाकासारख्या महत्त्वाच्या जीवन कौशल्याचे ज्ञान व्हावे. त्यातील कष्ट समजावेत व मुलांनी आई-वडिलांना घरी ही मदत करावी. लिंग समानतेचा धडा मिळावा.
एकदा स्वयंपाक तयार झाल्यावर मात्र सर्व शिक्षक विद्यार्थी यांची अंगत पंगत बसून सगळ्या स्वयंपाकावर ताव मारला आणि मुले एका महत्त्वाच्या जीवन कौशल्याचा अनुभव घेऊन आनंदाने घरी गेली.

