अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर–अकलूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालयाने आपल्या बहारदार, दर्जेदार व कलात्मक सादरीकरणाच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपद पटकावत ‘चॅम्पियन ट्रॉफी’चा मान मिळविला.
दि. १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत स्मृती भवन, शंकरनगर येथे भरविण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाने शहरी गटातून एकूण चार गीते सादर केली. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी परीक्षकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकली.
विविध गटांतील उल्लेखनीय यश
या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी गटातून सादर केलेल्या लावणी या गीतास प्रथम क्रमांक,
इयत्ता ८ वी ते १० वी गटातून सादर केलेल्या पाश्चिमात्य इंडोनेशियन गीतास प्रथम क्रमांक,
इयत्ता ५ वी ते १० वी गटातून सादर केलेल्या प्रासंगिक गीतास द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण या ज्वलंत सामाजिक विषयावर आधारित प्रासंगिक गीताचे प्रभावी सादरीकरण केले.
या सर्व गटांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर सदाशिवराव माने विद्यालयास यंदाचे सर्वसाधारण विजेतेपद बहाल करण्यात आले.
प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक करताना, “गेल्या २८ वर्षांत लावणी स्पर्धेतसुद्धा न पाहिलेली अदा व कौशल्य सदाशिवराव माने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले,” असे गौरवोद्गार काढले.
या यशानिमित्त विजेत्या ट्रॉफी, बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण तसेच कलाकार विद्यार्थी, नृत्यदिग्दर्शक, मार्गदर्शक शिक्षक व सांस्कृतिक प्रमुखांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना त्यांनी, “विद्यार्थ्यांची मेहनत, नृत्यदिग्दर्शकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे समर्पित सहकार्य यामुळेच हे उज्वल यश मिळाले,” असे सांगितले. तसेच आरोग्य ठीक नसतानाही विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देणारे नृत्यदिग्दर्शक मनोज वर्धन व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकुळे, संजय राऊत, कल्पना शिंदे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

