भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेस आज पासून सुरुवात झाली आहे. यात्रा 3 दिवस सुरु राहणार आहे.
आज सोमवार दिनांक 15/ 12/ 2025 रोजी पुजारी व मानकरी पालखी माहेरघरून देवीच्या मंदिरात घेऊन जातात. यावेळी विविध ठिकाणाहून आणलेल्या ज्योतीची ही मोठी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. अशी माहिती पुजारी सोमनाथ पाटील यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी दिनांक 16 /12/ 2025 रोजी गावातील मानकरी व पुजारी यांच्या घरातून वाजत गाजत देवीसाठी नैवेद्य दाखवला जातो. रात्री विविध कलाकारांचा देवीच्या गाण्याचा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.अशी माहिती देवीचे पुजारी हरिभाऊ लिंगे यांनी दिली.
बुधवारी दिनांक 17/12/2025 रोजी श्री च्या मूर्तीस पहाटे अभिषेक करून पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता व होमाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी अनेक पुजारी या होमातून जातात. अशी माहिती पुजारी महादेव कांबळे यांनी दिली.
तसेच या श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांच्यासाठी भंडाऱ्याची,नारळाची दुकाने, लहान मुलांची खेळणी, हॉटेल यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. तरी दुकानदारांनी व भाविक भक्तांनी या यात्रेत उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन सरपंच रणजीत जाधव यांनी केली आहे.

