भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातील महिलांसाठी ‘केळी चिप्स’ बनविण्याचे गरजेनुसार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या केळीपासून चवदार व बाजारात मागणी असलेले चिप्स तयार करण्याचे तंत्र महिलांना शिकवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट व गरज स्पष्ट केली. त्यानंतर केळीची निवड, सोलणे, पातळ काप करणे, योग्य तापमानावर तळणे, मसाले घालणे, साठवणूक व पॅकिंग याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.या कार्यक्रमात स्वच्छता पद्धती, गुणवत्तेचे नियंत्रण, तसेच उत्पादन विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ व ऑनलाइन माध्यमांचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
"आम्ही शिकलेले तंत्र घरी वापरून चिप्स तयार करून विक्री सुरू करू शकतो," असे सहभागी महिलांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे महिलांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असून, गावात आर्थिक स्वावलंबनाकडे एक नवे पाऊल पडले आहे.या वेळी कृषीदुत मंगेश क्षिरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजित खटके, शंतनु माळी, चैतन्य राऊत, अविष्कार शिंदे सहभागी होते.
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य.आर.जी.नलावडे तसेच प्रा. एस.एम .एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम.एम.चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.