पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदेबाबत पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी खुलासा व चौकशी करण्यासाठी मंदिर समितीच्या दि.23/07/2025 रोजीच्या सभेतील ठराव क्र. 01(1) अन्वये मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीमध्ये शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा सदस्य पदावर समावेश करण्यात आला होता.
या समितीने सदर प्रकरणाबाबत खुलासा व चौकशी करण्यासाठी दि.01 ऑगस्ट रोजी संबंधितांचे जाब-जबाब घेतले असून, लवकरच लेखी अहवाल मंदिर समितीच्या आगामी मुख्य सभेत सादर करण्यात येणार आहे. यावेळी चौकशी समितीचे सदस्य, प्रभारी व्यवस्थापक तथा लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख दादा नलवडे उपस्थित होते.
सदर प्रकरणांशी संबंधित व्यक्तींचा लेखी जबाब नोंदविण्यात आला आहे व सविस्तर चौकशी करण्यात आली. तथापि, श्री सग्गम यांनी विधीज्ञमार्फत लेखी अर्ज देऊन एक दिवसाची मुदत मागणी केली आहे. त्यानुसार त्यांना मुदतवाढ देऊन, त्यांचा उद्या जबाब नोंदविण्यात येणार आहे. तदनंतर लेखी अहवाल तयार करून मुख्य सभेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षा ॲड. माधवी निगडे यांनी दिली.