१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षातील कार्याचे कौतुक करून संघ कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विचारानंतर समाज माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल व देशाच्या विकासातील योगदानाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. यामागे संघाबद्दल असणारा गैरसमज निश्चितच जाणवतो म्हणूनच हा लेखन प्रपंच -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिले नाही अथवा सहभाग घेतला नाही याबाबत सातत्याने भ्रम पसरवला जातो, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सन १९२५ पूर्वी संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी काँग्रेसच्या कामामध्ये जबाबदारी घेऊन सक्रियपणे काम केले, क्रांतीकारकांच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवला व भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात प्रसंगी तुरुंगवासही भोगला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर संघ हा लगेचच संपूर्ण देशभर विस्तारलेला नव्हता. नागपूर व विदर्भातील काही जिल्ह्यात तसेच पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारख्या मोठ्या शहरात संघ सुरुवातीच्या काळात अत्यंत अल्प स्वरूपात अस्तित्वात होता. आणखी काही वर्षानंतर भारताच्या विविध प्रांतातील प्रमुख शहरांमध्ये संघाचे काम सुरू झाले. परंतु संघाचा जीव अत्यंत लहान होता म्हणजेच संघाची ताकद अत्यंत अल्प होती, तरीही संघ व संघ स्वयंसेवकांनी प्रत्येक गावामध्ये स्वातंत्र्यसंग्रामात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भाग घेतल्याचे अनेक पुरावे सापडतात. सन १९३० मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केल्यानंतर संघाच्या सर्व शाखांनी काँग्रेसच्या आवाहनानुसार २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला व काँग्रेसने स्वातंत्र्याच्या ध्येयाचा स्वीकार केल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन संघाच्या सर्व शाखांनी केले. काँग्रेसने जंगल सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी या सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरविले. वेगवेगळ्या गावातील स्वयंसेवकांनी त्या - त्या परिसरात होणाऱ्या सत्याग्रहात सक्रिय सहभाग नोंदविला. डॉ. हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव मार्गावर असलेल्या लोहारा जंगलात सत्याग्रह केला.२१ जुलै १९३० रोजी त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला दाखल होऊन त्यांना सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली व अकोला कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. डॉ.हेडगेवार यांना सहा महिन्यांची सश्रम कारावासाची जशी शिक्षा झाली त्याच प्रमाणे अनेक स्वयंसेवकांना देखील शिक्षा झाल्या. डॉ हेडगेवार यांनी शिक्षा भोगून आल्यानंतर लगेचच स्वातंत्र्यसंग्राम चळवळीला व संघाच्या कार्याला सुरुवात केली.
डॉ.हेडगेवार हयात होते,तोपर्यंत म्हणजेच सन १९४० पर्यंत तसेच डॉक्टरांच्या पश्चात श्री.माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर देखील संघ व संघ स्वयंसेवकांनी सातत्याने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे अनेक पुरावे सापडतात. त्या काळातील क्रांतिकार्याला देखील स्वयंसेवकांनी उघडपणे मदत केली. अनेक क्रांतिकारकांना भूमिगत ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांना सांभाळण्यासाठी इंग्रजांचा रोष पत्करून स्वयंसेवकांनी कार्य केले. श्री.सुभाषचंद्र बोस यांनी डॉ. हेडगेवार यांच्याकडून अनेकदा मार्गदर्शन घेतल्याचे देखील पुरावे सापडतात. डॉ.हेडगेवार यांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये श्री.सुभाषचंद्र बोस २० जून १९४० रोजी आले, परंतु डॉक्टरांची तब्येत अत्यवस्थ असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही व दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांचे निधन झाले. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील संघाचा व स्वयंसेवकांचा सहभाग हा लपून राहणारा नाही, परंतु संघाबद्दलची भ्रामक कल्पना पसरवण्यासाठी सातत्याने जो अपप्रचार केला जातो तो मात्र अत्यंत चुकीचा आहे. संघ अथवा संघाचे स्वयंसेवक अपप्रचाराला कधीही टीकात्मक उत्तर देत नाहीत तसेच प्रसिद्धीपासून ते सतत दूर राहत असतात, त्यामुळेच या विषयावर फारसे प्रसिद्धीला येत नाही म्हणूनच संघावर घेतला जाणारा आक्षेप लोकांना खरा वाटतो. परंतु वास्तविक परिस्थिती निश्चितच वेगळी आहे. संघ व स्वयंसेवकांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता हे मात्र सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे, सत्य आहे.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६