पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामूळे भीमा नदीला पूर आला आहे. भीमा नदी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे. उजनी धरणातून सायंकाळी 6 वाजता 1 लाख 51 हजार 600 क्युसेक तर वीर धरणातील विसर्ग कमी करुन 15 हजार 324 क्युसेक करण्यात आला आहे. पंढरपूर येथील भीमा नदी 1 लाख 44 हजार 498 क्युसेकने वाहत असल्याने शहरातील भीमा नदी काठावरील 137 कुंटुंबाचे सुरक्षितस्थळी प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.
संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेवून तालुक्यात गावपातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. यापूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करुन त्या ठिकाणी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीवर दगडी पूल व गोपाळपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच आपत्तीकालिन परिस्थिचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
शहरातील भीमा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टी येथील 80 कुटुंबांचे तर अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 57 कुटुंबांचे आज दुपारी स्थलांतर करण्यात आले आहे. तर येथील 400 पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोईने इतरत्र त्यांच्या पै पाहुण्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाली आहेत. सायंकाळी 5 वाजता संगम येथून 1 लाख 95 हजार 861 विसर्ग सुरु असून, हा विसर्ग पंढरपूरात रात्री दाखल होणार असल्याने व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील आणखी 100 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
भीमा नदीला पूर आल्याने 40 हजार क्युसेकला कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 1 लाख 7 हजार क्युसेकला पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला. तर 1 लाख 15 हजार क्युसेकला व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. तर 1 लाख 60 हजार क्युसेकला गोपाळपूर येथील नवीन पुल पाण्याखाली जातो. तसेच 1 लाख 80 हजार क्युसेकला संत पेठेत पाणी शिरते. सुरक्षेसाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.