पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वेरी च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘डिजिटल डिटॉक्स डे दिंडी २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. स्वेरी परिसर व गोपाळपूर ते रिद्धि सिद्धि गणेश मंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी मध्ये आजच्या युवा पिढीने डिजिटल साधनांचा वापर मर्यादित स्वरुपात व आवश्यक तेवढाच करावा याबद्धल जागृती करण्यात आली.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) आणि झेप फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि.६ जुलै २०२५ रोजी ‘डिजिटल डिटॉक्स डे दिंडी २०२५’ महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि गोपाळपूर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात देखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी होवून आपले योगदान देत असते. कोल्हापूर मधील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.डी.चेडे यांच्या हस्ते विठ्ठलमूर्ती पूजनाने या दिंडीचे उदघाटन करण्यात आले. प्रारंभी ‘डिजिटल डिटॉक्स दिंडी’चे आयोजन का करण्यात आले
याबाबत प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘आजच्या पिढीने डिजिटल साधनांचा वापर आवश्यक तेवढाच करावा. आपण आपल्या जीवनात डिजिटल शिस्त पाळली, तर मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील.’ झेप फाउंडेशनच्या संस्थापक रेखा चौधरी यांच्या प्रतिनिधी श्रीमती वृषाली चव्हाण यांनी ‘सोशल मीडियाचा अतिरेक टाळा आणि निसर्गाशी नाते घट्ट करा.’ असा बहुमोल सल्ला दिला. त्यानंतर दिंडी महाविद्यालयातून गोपाळपूर आणि पुढे रिद्धी सिद्धी गणेश मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी तुळस, पताका, टाळ हातात घेवून हरिनामाचा गजर करत होते आणि जनजागृती करत होते तर सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पांढरे धोतर व पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केला होता. एकूणच सर्वजण वारकऱ्यांच्या वेशात असल्यामुळे वारीचे वातावरण तयार झाले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व फलक घेऊन दिलेल्या 'डिजिटलला विराम देऊ या, निसर्गाशी नाते जोडूया’, ‘मोबाईलचा मर्यादित वापर करा’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमला तसेच ठिकठिकाणी डिजिटल डिटॉक्सचे महत्त्व पटवून देणारे लघुनाट्य सादर करून प्रबोधन करण्यात आले.
यावेळी स्वेरीचे सचिव प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे परीक्षा नियंत्रक डॉ. एस. ए. लेंडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.