रसायनमुक्त खाद्यतेलाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी गावामध्ये अलीकडेच एक अभिनव प्रात्यक्षिक घेण्यात आले, ज्यामध्ये कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तेल काढणी यंत्राचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले.
या प्रात्यक्षिकादरम्यान विविध प्रकारच्या बियापासून जसे की तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन यापासून तेल निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्षात दाखवली गेली. विद्यार्थ्यांनी रसायनमुक्त खाद्यतेलाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि त्याचे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर स्वरूप शेतकऱ्यांना समजावून सांगितले.खाद्यतेल उत्पादन व्यवसायामुळे शेतकऱ्यांना स्वतःचे उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते, तसेच गावपातळीवर स्वावलंबन साधले जाते. या वेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, तेल काढणी व्यवसाय कसा सुरू करावा, कोणत्या यंत्राचा वापर करावा, उत्पादन खर्च आणि नफा यांचे गणित स्पष्ट केले.
या कार्यक्रमात कृषीदूत क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे आविष्कार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समस्त ग्रामस्थ, शेतकरी बांधवांनीही कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.प्रात्यक्षिकाचे आयोजन अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) तसेच विषयतज्ञ प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.