विशेष लेख महाराष्ट्रात ही धोकादायक शाळांचे ऑडिट....?
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथे शालेय इमारतीचे छत कोसळल्याने 7 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.ही दुःखदायक दुर्घटना शाळेची प्रार्थना सुरू होण्याच्या कालावधीत घडली.. ही देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे.या शाळेत गरीब लोकांची मुले शिकत होती...! श्रीमंत व राजकीय लोकांची मुले शिकत असती तर...? या घटनेचा बोध घेऊन संपूर्ण देशातील धोकादायक शाळांचे ऑडिट होणे गरजेचे आहे.शिवाय पालकांनी गाफील न राहता गळक्या व मळक्या शाळा दिसल्या तर शासन व प्रशासनाला धारेवर धरणे गरजेचे आहे... नाही तर...झालावड ( पिपलोडी ) व्हायला वेळ लागणार नाही...
Right to Education कायद्यानुसार सुरक्षित,स्वच्छ व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम शाळा पुरवणे गरजेचे आहे. यानुसार महाराष्ट्रात प्रशासकीय व राजकीय लोकांनी विचार विनिमय करून शाळांची वस्तुस्थिती तपासणी करणे गरजेची आहे. ZP व पंचायत समिती स्तरावर समिती करून प्रत्येक शाळेच्या बांधकामाचे ऑडिट करणे गरजेचे वाटू लागले आहे. धोकादायक, मध्यम धोकादायक व सुरक्षित शाळा अशी वर्गवारी करून महाराष्ट्रातील जास्त खपाच्या किंवा तालुक्यातील जास्त खपाच्या वर्तमान पत्रात...शाळांची वर्गवारी घोषित करावी... म्हणजे पालक वर्ग सतर्क राहतील.. शिवाय प्रत्यक्ष पालकांनी ही आपल्या पोटाच्या गोळ्याला ज्या शाळेत प्रवेश घेतला आहे.. तेथील शाळेच्या भौतिक सुविधांवर लक्ष ठेवायलाच हवे.
स्थानिक नागरिक,शिक्षक व पालक वर्गानी एकत्र येऊन धोकादायक शाळांची माहिती शासनाला द्यायला पुढे आलेले केव्हाही चांगलेच... मुलांच्या जीवाशी खेळणे तरी होणार नाही. घटना घडून गेल्यावर राजकारणाची धूळ उडविण्यापेक्षा... मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात घालून शाळा जागतिक स्तराच्या कशा करता येतील याचा विचार केलेला केव्हाही चांगले.
राजस्थान मधील घटना म्हणजे देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील एक काळा डाग आहे. प्रत्येक व्यक्तींच्या जीवनातील मैलाचा दगड म्हणजे आपण शिकलेली शाळा....
ज्या शाळेत शिक्षण,संस्कार,चांगले,वाईट, नैतिक व अनैतिक तेचे धडे गिरवले...त्या शाळाच सुरक्षित नसतील....
घटना घडून गेल्यावर मग अश्रू,शोकसंदेश,शोकसभा व मदतीला काय अर्थ उरतो...! शेवटी येवढंच गळके छत, चिरा पडलेल्या भिंती, पडलेल्या भिंती, नाजूक झालेल्या खिडक्या दुर्घटनेला खुणावतात.. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने वेळीच लक्ष घालून... संभाव्य धोके लक्षात घेऊन... धोक्यापासून गरीब विद्यार्थी...जगात चांगला श्वास कशी घेतील...हे पाहणेच गरजेचे आहे.
प्रा.आनंदा आलदर ✒️🌱