पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर - पुणे या मार्गावरील शिवशाही बसेस ऑनलाईन बुकिंगसाठी आहेत.त्यातील खराब बस ऑनलाईनमधून वगळण्यात याव्यात अशी मागणी विभाग नियंत्रक यांचेकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर- पुणे या मार्गावर पहाटे पाचपासून दुपारी १२ वाजेपर्यंत आठ शिवशाही बसेस ऑनलाईन बुकिंगसाठी आहेत. त्याप्रमाणे प्रवासी मोबाईलवरुन किंवा इतर माध्यमातून ऑनलाईन बुकिंग करतात.प्रत्यक्ष त्यावेळी फलाटावर शिवशाही लागलेली नसते. तसेच फलाटावर आलेली शिवशाही बस वातानुकुलित,सर्व सोयी,सुविधा असलेली आरामबस असेल याचीही खात्री नसते.त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने,नाराजीने शिवशाहीचे तिकीट काढूनही साध्या बसने प्रवास करावा लागतो.यावेळी चालक,वाहक व प्रवासी यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात.बुकिंग करुनही शिवशाही बस नसल्याने प्रवाशांना मानसिक त्रास सहन करुन, रक्कम परत घेण्यासाठी वेळ घालवावा लागतो. हे सर्व केवळ शिवशाही बस ऑनलाईन बुकिंगमध्ये असल्याने होत आहे.
प्रत्यक्षात पंढरपूर किंवा आसपासच्याआगाराकडे एका मार्गावर सोडण्याएवढ्या शिवशाही बस उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे.सध्या शिवशाही बसेसबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत ही बाब विभाग नियंत्रक, जिल्हा वाहतूक अधिकारी, आगार प्रमुख यांचे निदर्शनास आणून दिली आहे
तरीही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.चांगल्या स्थितीतील शिवशाही बस आपणाकडे नाहीत ही बाब ते मान्य करायला तयार नाहीत.प्रवाशी,प्रवाशी संघटना यांनी ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्याबरोबर त्यावर गांभीर्याने,प्राधान्याने कार्यवाही करणे गरजेचे आहे मात्र याबाबत पत्रव्यवहार करून,संपर्क साधूनही पंढरपूर- पुणे या मार्गावर सलग आठ शिवशाही बस ऑनलाईन बुकिंगमध्ये आहेत.
तरी जेवढ्या सुस्थितीतील शिवशाही बस आहेत तेवढ्याच ऑनलाईन ठेवाव्यात. बाकी काऊंटर बुकिंगसाठी ठेवण्यात याव्यात. अशीच कार्यवाही संपूर्ण जिल्ह्यातील इतर आगारामध्येही होईल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते यांनी व्यक्त केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्हा वाहतूक अधिकारी यांचेकडे संपर्क केला असता किरकोळ त्रुटी असतात त्याकडे दुर्लक्ष करावयाचे असते, सर्व सुविधांची अपेक्षा ठेवू नका व ऑनलाईनमधून अशा बस वगळता येत नाहीत असे मत व्यक्त केले.