बदलापूर प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
श्री पार्थ अकॅडमी, कॉमर्स ॲस्पायर आणि गॅलॅक्सी एज्युकेअर बदलापूर मधील या तीन नामवंत शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'एड्युब्रिज' संस्थेच्या वतीने ‘स्फूर्ती २०२५’ हा पहिला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमात २०२५ मध्ये दहावी, बारावी (कॉमर्स व सायन्स) व सी एम ए (CMA) परीक्षांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या महत्त्वावर भाष्य करत, त्याचबरोबर विविध प्रयोग करत, हसतखेळत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. श्रीधर पाटील (शिवसेना गटनेते, बदलापूर),श्री. अरुण सुरवळ (माजी नगरसेवक),श्री. गुरुनाथ तिरपणकर (अध्यक्ष, जनजागृती सेवा संस्था)श्री अजय जोशी (पत्रकार, राज्य माझा)यांची उपस्थिती लाभली.
यावेळी एड्युब्रिज संस्थेचे संस्थापक-संचालकश्री. स्वप्निल कळसकर (श्री पार्थ अकॅडमी),श्री. राहुल खेडकर (कॉमर्स ॲस्पायर),श्री. शुभम उपाध्याय आणि श्री. राजेश सिंह (गॅलॅक्सी एज्युकेअर) यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची एक विशेष बाब म्हणजे वर्षभर विद्यार्थ्यांच्या मागे लागून त्यांना शिकवणारे शिक्षकवृंदही उपस्थित होते. त्यांच्या योगदानामुळेच हा यशाचा सोहळा घडू शकला, हे सर्वच पालकांनी मान्य केले.
शिरगावमधील पेंडुलकर हॉल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खचाखच भरला होता. त्यांच्या उत्साही उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमात एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. महेंद्र घारे सर यांनी आपल्या मराठमोळ्या आणि ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमास एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले.
‘स्फूर्ती २०२५’ हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नव्हता, तर तो प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा एक मैलाचा दगड ठरला.