मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील सौ. सुषमा मधुकर साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या मोहोळ तालुका महिला विभागाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या मोहोळ तालुकाध्यक्षा सौ. शुभांगी तुकाराम लंबे यांनी ही घोषणा केली. खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सौ. सुषमा साठे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
पक्षाच्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, "पक्ष संघटनेची मजबुती व विस्तार साधण्यासाठी सुषमा साठे यांचा अनुभव व कार्यक्षमतेचा निश्चितच उपयोग होणार आहे," असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीनंतर सुषमा साठे यांचे तालुकाभरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वात महिला विभाग अधिक सक्रिय होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.