वैराग प्रतिनिधी तेज न्यूज
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील नागोबा चौकात भरदिवसा एस.टी. बसच्या धडकेत एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गु.र.नं. 148/2025 नुसार बी.एन.एस. कलम 106(1), 281 आणि मोटार वाहन अधिनियम कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रितेश दशरथ कादे (वय 28, रा. वाळुज, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला शांताबाई उत्रेश्वर घाडगे (वय 65, रा. वाळुज) या त्यांच्या आत्या होत्या. दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास त्या नागोबा चौक, गौडगाव येथे रस्त्यावर असताना धाराशिवहून वैरागकडे जाणारी एस.टी. बस (क्रमांक MH-20-BL-2042) ही भरधाव वेगात येत होती.
बसचा चालक सुर्यकांत बापुराव घोडके (रा. मालेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने बस अविचाराने व बेदरकारपणे चालवून शांताबाई घाडगे यांना जोरात धडक दिली. बसचे पुढील आणि मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक मुंडे (1342) करीत असून, पोहेकॉ पेठकर (1560) यांनी गुन्हा दाखल केला आहे. वैराग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.