पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी "संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग" या विषयावर एकदिवसीय कौशल्याधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सौ. पुनम गवळी यांनी केले. संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग या कार्यशाळेचे
उद्दीष्ट समजावून सांगीतले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यात वृद्धी घडवून त्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान मिळवून देणे हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट होते.
कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी सौ. धनश्री भोसले आणि सौ. माधुरी वाघमारे यांनी आपले तांत्रिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रभावी पद्धतीने सांगीतले.
सत्रामध्ये संगणकाचे अंतर्गत भाग – मदरबोर्ड, रॅम, सीपीयू, एसएमपीएस, स्टोरेज डिव्हाइसेस यांची ओळख, संगणक असेंब्ली व डिसअसेंब्ली, ऑपरेटिंग सिस्टम व ड्रायव्हर्सची प्रतिष्ठापना, स्विचेस, राऊटर्स, लॅन केबल्स यांसारख्या नेटवर्किंग उपकरणांची माहिती, IP ऍड्रेसिंग, बेसिक नेटवर्क सेटअप आणि हार्डवेअर व नेटवर्किंगमधील सामान्य त्रुटी ओळखून त्यांचे निवारण या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला.
या कार्यशाळेमुळे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष हाताळणीद्वारे समजून घेण्याची मौल्यवान संधी मिळाली. त्यामुळे भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक गरजांसाठी ते अधिक सक्षम व आत्मविश्वासपूर्ण झाले आहेत.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि याप्रकारच्या कार्यशाळा भविष्यात अधिक प्रमाणात होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सदरील कार्यशाळा यशस्वी करणेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.