पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
२६ एप्रिल २०२५ — एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथे अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी "उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती संधी" या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अनुसूचित जाती-जमाती विकास कक्षाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभाग, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप धर्मराज मोरे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. रविंद्र कदमपाटील यांची ऑनलाइन उपस्थितीही लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते समाजकल्याण विभाग, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप धर्मराज मोरे यांनी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची सखोल माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठीय तसेच परदेशी शिक्षणासाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व शाखांतील सुमारे ७० विद्यार्थी या व्याख्यानात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त व सकारात्मक होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचलन कु. वैष्णवी चव्हाण व कु. पूर्वा वाखरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सोमनाथ कोळी यांनी केले.