पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर नगरपरिषद अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागा तर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. अग्निशमन व विमोचन कार्य करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मृती स्तंभाला मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांचे शुभहस्ते व उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळुजकर, आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे, अग्निशमन अधिकारी श्री संभाजी कार्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले यांनी सांगितले की अग्निशमन दिन (Fire Service Day) भारतात दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी अग्निशमन दलातील शूर जवानांनी आपल्या कर्तव्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली जाते.
१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये (Victoria Dock) एक भयानक आग लागली होती. एका जहाजात स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. या आगीमध्ये ६६अग्निशमन कर्मचाऱ्यांनी जीव गमावला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस "अग्निशमन दिन" म्हणून पाळला जातो.
तसेच १४ ते २० एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो.१४ एप्रिल रोजी अग्निशमणाचे कार्य करीत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.तसेच अग्निशमन सेवा सप्ताह मध्ये मॉक ड्रिल्स, आग प्रतिबंधक उपायांची माहिती, आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी अग्निशमन दलातील जवान यांनी पंढरपूर शहरांमधून अग्निशमन वाहनांची रॅली काढण्यात आली सदर रॅलीचा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या अग्निशमन सेवा सप्ताह मध्ये अग्निशमनाविषयी जनतेमध्ये जनजागृती करणे करिता शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षा प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले यांनी दिली.