सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गेल्या वर्षभरात सोलापूर शहरांमध्ये हजारो वृक्षारोपणे झाली आहेत. ही रोपे वाढीला लागली आहेत.सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असुन वाढत्या तापमानाने ४१ शी पार केलेली आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही आता आणखीन कमी होईल. उन्हाळ्याच्या अशा या विपरीत स्थितीत रोपांचे उन्हापासून संरक्षण करणे आणि रोपांचे संगोपन, संवर्धन करणे गरजेचे आहे.
सोलापूर महानगरपालिकेसह शहरातील विविध पर्यावरणीय संस्था काही संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्ती अशा प्रकारे रोप संवर्धनाचे काम करत आहेत. तरीही रोपे,झाडे जगवण्यासाठी आणखीन बरेच प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शहराच्या पर्यावरणाचा समतोल साधून शहर पर्यावरणीय हिरवाईनें नटण्यासाठी आता सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांनी सुद्धा पुढे येणे ही आजची निकडीची गरज आहे. याच गरजेपोटी परसबाग सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीच्या उन्हाळ्यात वृक्ष संवर्धनासाठी झाडांना पाणी मिळावे या हेतूने एक बाटली पाणी झाडासाठी या लोकजागृती व लोकसहभाग अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता महापालिकेच्या आवारात आयुक्त डॉ .सचिन ओंबासे यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती सोमनपाचे उपायुक्त तैमुर मुलाणी आणि परसबाग सोलापूरचे नारायण पाटील यांनी दिली आहे.अशाप्रकारचे वैशिष्ठ्यपूर्ण लोकसहभाग अभियान सोलापूरात प्रथमच राबवण्यात येणार आहे.
अभियानाची संकल्पना
आपण कोणत्याही कामासाठी जेव्हा जेंव्हा घराबाहेर पडतो तेंव्हा तेंव्हा आपण पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घेतो. अगदी त्याचप्रमाणे झाडासाठी आणखीन एक बाटली पाणी आपण सोबत घ्यावी. ते पाणी आपल्या सोयीनुसार वाढीस लागलेल्या अथवा आवश्यकता असलेल्या झाडाला घालावे. झाडांना नियमितपणे पुरेसे पाणी मिळावे यासाठी झाडाच्या गरजेनुसार ५-१० जणांच्या गटाने एक झाड ठरवुन घ्यावे.त्या झाडाला नियमितपणे पाणी घालावे. अगदी शाळकरी मुलांपासून फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक, गृहिणी, युवक - युवतींसह प्रत्येक लहान थोर नागरिकांनी यासाठी निर्धारपूर्वक आपले योगदान देणे अपेक्षित आहे. असं झालं तर यावर्षी शेकडोच्या संख्येने रोपण केलेली झाडे, त्यापूर्वीची अशक्त झाडे जगतील. पावसाळ्यात हीच झाडे छान बहरतील. मग पर्यायानें सोलापूर शहरातील पर्यावरणाचे संवर्धन होत राहील. मग हळुहळु सोलापूरचा पर्यावरणीय चेहरा मोहरा सुखावह वाटेल इतका बदलेल.
शहरवासीयांना आवाहन
वृक्ष संगोपन आणि वृक्ष संवर्धनाच्या कामाचा व्याप आणि पसारा मोठा आहे. त्यासाठी स्वयंप्रेरित पर्यावरणप्रेमींनी स्वयंप्रेरणेने न कार्यरत होणे ही आजची निकड आहे.त्यासाठी सोलापूर शहरातील युवक - युवती,शिक्षण संकुले, गृहिणी, जेष्ठ नागरिक तसेच व्यक्ती, संस्था, तरुण मंडळे,भजनी मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध क्षेत्रातील आस्थापना, सामाजिक - राजकीय संस्था यासारख्या सर्वच क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी या कामासाठी जमेल तितका वेळ आवर्जून द्यावा.
परसबाग सोलापूर या पर्यायावर स्वयंसेवी पर्यावरणीय व्यासपीठाचा परिचय
परसबाग सोलापूर हे स्वयंसेवी पर्यावरणीय व्यासपीठ आहे. संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन ही त्याची कार्य संकल्पना आहे. सोलापूर शहर कार्यक्षेत्रातील होम गार्डनिंग तथा परसबाग आणि सोलापूर शहराचे पर्यावरण या दोन विषयावर व्यासपीठ गेल्या पाच वर्षापासून सोलापूर शहरांमध्ये कार्यरत आहे.व्यासपीठाचा स्व-रचित असा स्वतंत्र मोटिवेशनल अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. त्यानुसार एक बाटली पाणी झाडासाठी या अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे.
दैनंदिन घरगुती बागकामा बरोबरच झाडाचा वाढदिवस, गप्पा बाग प्रेमींनी,शिवार फेरी,झाडाची भाऊबीज, देशी वृक्षांचे रोपण, वामन वृक्ष अर्थात बोन्साय वृक्ष कला - प्रसार व संवर्धन, वाळवंटातील गुलाब अर्थात अडेनियम चा प्रसार, विविध कार्यानुभव कार्यशाळा, बागभेटी, बागेतील काव्य काव्य गुंफण, पर्ण पुष्प व कलाकृती, प्रयोगशील बागप्रेमी, यासारख्या विषयांच्या कार्यानुभवनवाचा समावेश असून यासंदर्भात व्यासपीठाचे स्वतंत्र असे कार्य रचना व कार्य धोरण आहे. माती विरहीत बागकाम आणि देशी वृक्ष संवर्धन या कार्य विषयावर व्यासपीठ सध्या प्राधान्याने काम करत आहे.