पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मातोश्री वृद्धाश्रमासाठी एक प्रकारची ऊर्जा देणारा ठरावा असा उपक्रम स्वेरीतील मेसाच्या विद्यार्थ्याकडून नुकताच आयोजित करण्यात आला. स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी गोपाळपूर मधील श्री. संत तनपुरे महाराज संचलित मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन काही काळ तेथील वृद्ध आजी आजोबांसोबत घालवला. मेसातील विद्यार्थ्यांनी ‘आपुलकी’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत वृद्धांसोबत प्रेम व आपुलकीची देवाण घेवाण करून एक दिवस उत्साहवर्धक रीतीने घालविला. पंढरपूर पंचक्रोशीत हा उपक्रम मात्र चांगलाच चर्चेचा ठरला !
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता महाविद्यालयातून शैक्षणिक, क्रीडा, विधायक व सामाजिक अशा विविध विषयावर संस्कार दिले जातात. त्याचाच एक भाग म्हणून स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील 'मेसा' तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देवून तेथे सकारात्मक असे कार्य केले. प्रारंभी मेसाचे समन्वयक प्रा. एस. एन. मोरे यांनी मातोश्री वृद्धाश्रमामध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी स्वेरीतील सर्व सहकार्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. एन. यु. कौटकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपयोगी व प्रेरणादायी कार्य करण्यासाठी प्रेरित केले. वृद्धाश्रमाचे अधिकारी श्रीकांत देशपांडे व सुनंदा छत्रे यांनी वृद्धाश्रमाबाबत व तेथील कार्याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी मेसातील विद्यार्थ्यांकडून वृद्ध आजी आजोबांसाठी गरमागरम नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. सोबतच सफरचंद, केळी, लाडू आदी खाद्यपदार्थांचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी वृद्ध महिला व आजोबा मंडळी यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस केली. वृद्धांनी मायेने विद्यार्थ्यांच्या अंगाखांदयावरून हात फिरवला. साधारणपणे दोन तास त्यांच्यासोबत राहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप घेतला. एकूणच विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील नागरिकांची अविस्मरणीय अशी भेट झाली. या कार्यक्रमात आदित्य चोरमले, प्रणव पाटील, प्रियांका सोनवणे, संस्कृती मोरे, प्रतिक येडवे, प्रतीक्षा चौधरी, ज्ञानेश्वरी मिटकरी, मानसी कंदी यांच्यासहित जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चांगले कार्य केल्याबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मेसातील विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. ‘आपुलकी’ चा हा कार्यक्रम उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले, प्रा. एस. एम. वसेकर यांच्यासह इतर शिक्षकांच्या सहकार्याने संपन्न झाला. प्रताप लवळे व प्रणव पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी प्रतिनिधी देवांश खरे यांनी आभार मानले.