मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त प्रीमियर शिक्षण मंडळाच्या गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे, एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ, स्काऊट गाईड व आरएसपी मार्गदर्शक अवधूत चव्हाण, प्रणिता रुईकर, अमोल जागले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक कमिशनर मुंबई पोलीस तसेच माजी एटीएस अधिकारी राजू ( आनंद) पाटील शाळेचे माजी मुख्याध्यापक दीपक हेदुलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोहिनूर समूह संचलित प्रिमीअर शिक्षण मंडळाच्या गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथे राष्ट्रीय छात्र सेना दिनाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते एनसीसी ध्वाजारोहणानंतर छात्र सेना, स्काऊट गाईड, आरएसपी आणि बँड पथकातील विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचालन करुन एनसीसी ध्वजास मानवंदना दिली.
भारतीय सैन्य दलाचे वाघा बॉर्डर,आटारी येथील प्रात्यक्षिके, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे संकटकाळी स्व-संरक्षणात्मक आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय, आरएसपी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण केले. लोकजागरण प्रतिष्ठानचे प्रशिक्षक मंगेश केणी, क्षितिज केणी व विराज तांडेल यांनी शिवकालीन तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. लेझिम, मानवी मनोरे, छात्र सेनेची तालबद्ध संचालने अशा भरगच्च कार्यक्रमास शाळेचे शिक्षक पालक,माजी विद्यार्थी यांनी जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. “ तुमच्या मध्ये प्रचंड ऊर्जा असून तुम्ही ती देशाच्या सेवेत सत्कारणी लावा. लहानपणीच आपली आवड ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडताना मार्गदर्शन घ्या” असे आनंद पाटील यांनी मत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट छात्र सैनिक, क्रीडा सप्ताहातील विजेते यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेच्या पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले, शाळेचे कला शिक्षक रत्नकांत विचारे आणि ज्येष्ठ शिक्षिका अर्चना जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय छात्र सेना गीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.