सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. ९ ते १५ डिसेंबर दरम्यान हॉटेल प्रथम, सोलापूर येथे आडके हॉस्पिटल, आडके फाउंडेशन व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोगांवरील अतिप्रगत रशियन इलिझारोव्ह तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी फेलोशिपचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यास भारतातूनच नव्हे तर जगभरातून श्रीलंका , कॅमेररुन , बुरुंडी, सुदान , इथीओपिया अशा अनेक देशातून अस्थिरोग तज्ञांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे. इलिझारोव्ह हे रशियन तंत्रज्ञान असून जवळपास शरीरातील ८० टक्के अस्थिरोगांवर विना चिरफाड ,खात्रीलायक व कमी खर्चात उपचार करता येतात. सोलापुरातील अस्थिरोग व इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके हे गेली दहा वर्षे अशा फेलोशिपचे आयोजन करून प्रशिक्षण देत आहेत. दरवर्षी या कार्यक्रमास असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो परंतु सोलापुरात विमानसेवा नसल्यामुळे भारतातून येणाऱ्या व परदेशी अस्थिरोग तज्ञांना सोलापूरमध्ये पोहोचण्यास भरपूर वेळ खर्च घालावा लागतो व नाहक मनस्ताप सोसावा लागतो.काही अस्थिरोग तज्ञांना ऐन वेळेस व्हीसा मिळाल्यामुळे त्यांना सोलापूर पर्यंत पोहोचता आले नाही. सोलापुरात अद्ययावत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असून केवळ विमानसेवा नसल्यामुळे सोलापूरची नाचक्की होत आहे.
सोलापुरात आडके हॉस्पिटल द्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रुग्णांवर उपचार व अस्थिरोग तज्ञांना प्रशिक्षण देण्यात येते. परंतु सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सोलापूरचे विमानतळ आम्ही कार्यान्वित करून दाखवून सुद्धा निष्क्रिय लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अजून विमान सेवा सुरू करता आली नाही त्यामुळे सोलापुरातील सर्वच उद्योगधंदे व व्यापाऱ्यांना झळ बसलेली आहे. ही सोलापूर साठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
डॉ. संदीप आडके.
कोर्स डायरेक्टर, आडके हॉस्पिटल सोलापूर.
मला कॅमेरुनहून येथून दिल्लीला यावे लागले व तेथून मुंबईला विमानाने येऊन मुंबई ते सोलापूर रेल्वेने यावे लागले. यामध्ये जवळपास १८ तासांचा प्रवास करावा लागला. येथे विमान सेवा असली असती तर हा वेळ बराच कमी झाला असता.
डॉ. क्लोवीस फान अवाच.
कॅमेरुन ,आफ्रिका.
श्रीलंकेहून दोन तासात मी भारतात पोहोचलो परंतु हैदराबाद वरून पाच तासाचा रेल्वे प्रवास करून मला सोलापूर गाठावे लागले. या ठिकाणी प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे परंतु सोलापुरात अजूनही विमानसेवा नाही हे गोष्ट धक्कादायक आहे.
डॉ. अहमद निहाज
श्रीलंका.
बेंगलोर वरून गुलबर्गा येथे मी विमानाने आलो व गुलबर्गा ते सोलापूर तब्बल पाच तास खराब रस्त्यावरून यावे लागले. पुन्हा परतीचा प्रवास करताना मी विमानाचे तिकीट रद्द करून रेल्वेने जाणार आहे.सोलापूर येथे थेट विमान सेवा असली असती तर मी केवळ दीड तासांमध्ये सोलापुरात पोहोचू शकलो असतो.
डॉ. संदीप पाटील.
कर्नाटक.