पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘इल्युमिनेट वर्कशॉप’ (उद्योजकतेवर आधारित कार्यशाळा) चे आयोजन केले होते. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेच्या माध्यमातून करिअर बाबत योग्य दिशा मिळाल्याने आपले करिअर उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
‘स्वेरीज् इ- सेल स्टुडन्ट टीम’ आणि ‘आयआयटी बॉम्बे इ-सेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल मध्ये ही एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी आयआयटी बॉम्बेच्या इ-सेल कडुन उद्योजिका दीप्ती नथाला हया मार्गदर्शक म्हणून लाभल्या. दीप्ती नथाला हया आयआयटी मद्रासच्या पदवीधर असून त्यांचे स्वतःचे दोन स्टार्टअप आहेत. ‘शार्क टँक इंडिया’ या टेलिव्हिजन शोमध्ये त्यांनी उत्तमरीत्या सादरीकरण केले होते. त्यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांना ‘उद्योजकतेवर’ बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नथाला यांनी आंत्रप्रन्युअरशिप माईंडसेट, उद्योजकतेमध्ये करिअर करताना आपली मानसिकता कशी असावी ? तसेच बिजनेस मॉडेल कॅनव्हास यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करून घेण्यात आल्या. या कार्यशाळेचे आयोजन स्वेरीच्या स्टुडंट इ-सेल टीमने ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज-२०२४’ अंतर्गत उत्तमरीत्या केले. या कार्यशाळेतून स्वेरीतील विद्यार्थ्यांना ‘इव्हेंट ऑर्गनायझेशन’चा देखील अनुभव मिळाला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल व नियोजन बद्ध मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये असे विविध उपक्रम राबवले जातात.
यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो व संशोधनाकडे त्यांचा कल अधिक राहतो. यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन चांगले करिअर करण्यासाठी हातभार लागतो. सातत्याने होत असलेल्या अशा संशोधनात्मक कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थीनी प्रतिनिधी समिक्षा खटावकर तसेच इ-सेल टिम मधील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेत डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार, स्वेरीचे अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.