भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137 वा जयंती सोहळा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी ता. पंढरपूर या ठिकाणी उत्साहात पार पडला. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पाटील यांच्या 137 व्या जयंती सोहळा निमित्त विद्यालयात सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभेचे अध्यक्ष नानासाहेब लिगाडे, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा .प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे सहसचिव ऑडिट विभाग, प्रमुख वक्ते मा.प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे सहसचिव उच्च शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्था सातारा उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व पुष्परचना स्पर्धा यांचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस.डी रोकडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचा स्वागत करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षक एस जी जरे यांनी शाखेचा 2023 -24 चा शाखा अहवाल वाचन केले. बक्षीस वितरण समारंभामध्ये गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस वितरणाचे वाचन संजय शिंदे यांनी केले.
विद्यार्थी मनोगतांमध्ये पृथ्वीराज जाधव याने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी आपले विचार व्यक्त करताना गावकऱ्यांचे व स्कूल कमिटी यांचे शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ग्रामस्थ मनोगतामध्ये माजी मुख्याध्यापक भिमराव जाधव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्र व कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की माजी मुख्याध्यापक गायकवाड यांनी बांधलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये काटकसर करून जवळपास ५० लाख रुपये संस्थेचे वाचवले. तसेच मुख्याध्यापक म्हणून त्यांनी या शाळेमध्ये १० ते ११ वर्षे एक उत्तम प्रशासक म्हणून अतिशय चांगले काम केले. याबद्दल कौतुक केले. नवीन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे (सहसचिव उच्च शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्था सातारा) यांनी कर्मवीरांची जयंती का व कशासाठी साजरी करावी यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रयत गीतामधील ओळीचा अर्थ स्पष्ट केला.
अध्यक्षीय भाषणात नानासाहेब लिगाडे (जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा) यांनी या शाळेची दहा-बारा वर्षांपूर्वीची अवस्था आणि आजची स्थिती यावर प्रकाश टाकला तसेच हे विद्यालय प्रगतीपथावर नेण्यासाठी गायकवाड यांनी अतिशय मोलाचे काम केले. या विद्यालयाची विस्कटली घडी बसवण्याचे काम माजी प्राचार्य गायकवाड यांनी केले असे मत व्यक्त केले. उद्घाटनासाठी शरदचंद्र पवार यांच्याकडे विनंती करू अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य भगवानराव चौगुले, वामनभाऊ सराटे, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव, उपसरपंच नितीन शिंदे माजी मुख्याध्यापक गायकवाड एन. एम. , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र लाले ,सचिन शिंदे, सर्व समित्यांचे सदस्य, ग्रामस्थ, सेवानिवृत्त रयत सेवक माजी विद्यार्थी व विविध शाखेतील सेवक उपस्थित होते.
शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जाधव के .के .जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम .के .भोसले व विधाते बी.ए.यांनी केले. सभेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डी एल रोकडे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.