सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जुनी मील बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टच्या मालकीच्या मोतीबाग, कंबर तलाव जवळ या जागेत बारा अनधिकृत होर्डिंग्ज असल्याची तक्रार ट्रस्टचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी आज मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर जागा ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे.या जागेत १२ अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याची तक्रार सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे दि.१७/०५/२०२४ रोजी करण्यात आली होती.
या जागेत चंदूकाका सराफ, मोहिनी वॉटर पार्क, एमआयटी ,शिंगवी ज्वेलर्स, सिद्धी सुझुकी, करिअर पॉईंट, अस्त्रल बाथवेअर , भारत गॅस एचपी इंडियन ऑइल, मलबार तनिष्क ज्वेलरी व आकाश कोचिंग अशी होर्डिंग्ज उभी आहेत. ही जागा जुनी मील ट्रस्टच्या मालकीची असताना व या जागेत अशी होर्डिंग लावू नयेत असे ट्रस्ट द्वारे गेली दोन वर्ष सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर व शितल तेली उगले यांच्याकडे तक्रार करून सुद्धा ही होर्डिंग्ज हटवण्यात आलेली नाहीत.
काही ठेकेदारांनी बोगस कागदपत्रांद्वारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस परवाने घेतल्याचे निदर्शनास येत आहे.महानगरपालिकेने सोलापुरात १३३ होर्डिंग्ज असून व त्यापैकी १२ अनधिकृत होर्डिंग्स असल्याचे सांगितले आहे .यापैकी जर १२ होर्डिंग्ज एकाच ठिकाणी असतील तर नक्कीच सोलापुरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असणार आहे व सोलापूर महानगरपालिकेत हे होर्डिंग स्कॅन्डल अनेक वर्षापासून सक्रिय आहे हे स्वकृत दर्शनी दिसून येत आहे. ही अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवून यांना बोगस परवाने देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर व जाहिरात एजन्सीजवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ट्रस्ट द्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. यावर कारवाई झाल्यास दुसऱ्यांच्या जागेवर लाखो रुपयांचा मलिदा खाणारे सोलापुरातील 'भींडे' कोण व महापालिकेतील त्याचे साथीदार कोण याचा पर्दाफाश होईल.