पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जंवजाळ यांनी केली.
वारकरी संप्रदायातील महत्त्वाची वारीपैकी चैत्री वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असल्याने भाविकांना मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, शुध्द पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.
श्रीच्या गर्भगृह संवर्धन कामांची पाहणी
काम वेळेत पूर्ण करण्याच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सूचना
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असून, सदर ठिकाणच्या कामांची मंदीर समितीच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली. यावेळी संबधित ठेकेदाराने नेमून दिलेल्या वेळेत दर्जेदार काम करावे. तसेच पुरातत्व विभागाने व संबंधित ठेकेदाराने यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या.
तदनंतर आराखड्यातील कामासंदर्भात सह अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9.30 वाजता मंदिर कार्यालयात सभा संपन्न झाली. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ. दिनेशकुमार कदम, ह.भ.प.भास्करगिरी महाराज, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभीम पावले, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
या वेळी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच सोळखांबी येथील सर्व लाकडी दरवाजांना देणगीदारांमार्फत चांदी लावणे. तसेच विठ्ठल सभा मंडप येथील संवर्धनाचे काम आषाढी यात्रे पूर्वी पूर्ण करणे. याशिवाय, दर्शन रांगेतील कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या 4 पत्राशेडचे नूतनीकरण करणे, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे विद्युत व्यवस्थेसाठी सोलर पॅनल बसवणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.