सरकारने पाठवलेल्या पदोन्नतीत शिक्षणाधिकाऱ्यांना सेवेत सामील करून घेण्यास नकार
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदावर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या शिक्षणाधिकाऱ्याला पदभार देण्यास पालिकेने सपशेल नकार कळवल्याने खळबळ माजली आहे. सरकारने नियुक्त केलेला शिक्षणाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वीच उपशिक्षणाधिकारी श्री. राजू तडवी यांचीच पालिकेने एका रात्रीत पदोन्नती जाहीर करत पालिकेच्या शिक्षणाधिकारी पदी कार्यभार सोपवला. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पालिकेने तातडीने राज्याच्या शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या श्रीमती स्मिता दिघे यांची नियुक्ती करावी, सरकारी नियम धाब्यावर बसवून उपशिक्षणाधिकारी श्री. राजू तडवी यांच्या पदोन्नतीचे आदेश देणाऱ्या पालिका शिक्षण अधिकारी तसेच पालिका आयुक्तांची याप्रकरणी चौकशी करून पालिका शिक्षण विभागातील आर्थिक घोटाळा उघडकीस आणावा, अशी मागणी शिक्षण हक्क कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे मुंबई अध्यक्ष श्री. नितीन दळवी यांनी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या महिन्याच्या अखेरीस २६ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाने 'अ' श्रेणीतील शिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नती जाहीर केली. यासंदर्भात सरकारी अध्यादेश जारी करण्यात आला होता. 'अ' श्रेणीतील शिक्षणाधिकारी श्रीमती स्मिता दिघे यांची नियुक्ती पालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदावर केली गेली.
पालिका शिक्षणविभागाचा गौडबंगाल
सरकारी अध्यादेश जारी होताच २२६ फेब्रुवारी रोजी उपशिक्षणाधिकारी श्री. राजू तडवी यांची शिक्षणाधिकारी म्हणून बढती केल्याचे पालिका शिक्षण विभागाने श्रीमती स्मिता दिघे यांना कळवले. दुसऱ्या दिवशी या संदर्भातले पत्रक पालिका शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले. पत्रकाच्या आधारे श्रीमती स्मिता दिघे यांना सामावून घेण्यास पालिका शिक्षण विभागाच्या पालिका संचालित शाळांचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी नकार दिला. कंकाळ यांच्याकडे पालिका शाळांच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. कंकाळ यांनी कोणत्या नियमांच्या आधारावर राज्य सरकारच्या आदेशाची अवहेलना केली, असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे. विशेष पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि तडवी यांची बढती हि २७ फेब्रुवारी रोजी झाली व त्यांनी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार २६ फेब्रुवारी रोजी स्वीकारला, २७ फेब्रुवारीला बढती झाली असताना एक दिवस अगोदर म्हणजे २६ फेब्रुवारीला तडवी कार्यभार कसा स्वीकारु शकतात, असा सवाल महासंघाचे दळवी यांनी तक्रारीत केला आहे.
शिक्षण हक्क कार्यकर्त्यांचा आरोप
श्री. राजू तडवी यांच्याकडे मुंबईतील खासगी शाळांच्या कामकाज नियमनाची 'उपशिक्षणाधिकारी'म्हणून जबाबदारी आहे. या पदावर श्री. तडवी गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अनेक विनाअनुदानित शाळांमधील गैरप्रकार उघडकीस आलेत. अनेक तक्रारी दाखल करूनही श्री. तडवी यांनी अनेक शिक्षण संस्थांच्या चालकांना पाठीशी घातले. मुंबईतील अनेक खाजगी शाळांमध्ये होणारी भरमसाठ फी वाढ, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आदी प्रकारांना श्री. तडवी यांचा 'आशीर्वाद' आहे, असा थेट आरोप महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे मुंबई अध्यक्ष श्री. नितीन दळवी यांनी केला आहे.
श्री. तडवी यांची वादग्रस्त पार्श्वभूमी असताना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन करतात, तडवी यांच्याकडून मिळणारा आर्थिक मलिदा बंद होऊ नये, यासाठीची तजवीज म्हणून एका रात्रीतच त्यांची पदोन्नती जाहीर केली जाते हा सर्व घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप श्री. दळवी यांनी केला. पालिका आयुक्त श्री. इकबालसिंग चहल यांनी या संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
श्री. दळवी यांनी राज्य सरकारच्या शिक्षण विभाग, नगरविकास खाते यांच्याकडे पालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.