सोलापूर प्रतिनिधी
राज्यपाल यांच्या दि. १४ मार्च २०२४ च्या आदेशानुसार सोलापुरातील प्रसिद्ध नेत्र व बाल नेत्ररोगतज्ञ डॉ.संतोष शंकरराव आडके यांची धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरता गठीत जिल्हास्तरीय समितीवर नामनिर्देशित सदस्य 'वैद्यकीय क्षेत्र- तज्ञ डॉक्टर' या पदावर नियुक्ती झालेली आहे.सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वित खाटांपैकी दहा टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व दहा टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्यांच्या या मानाच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील गरीब व निर्धन रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत व सवलतीच्या दरात रुग्णसेवा मिळवून देण्याचे अधिकार मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना त्याचा बहुमोल फायदा होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने डॉ.संतोष आडके यांची केलेली नियुक्ती म्हणजे त्यांनी गेली तीस वर्षे निस्वार्थीपणे केलेल्या
रुग्णसेवेची पावतीच आहे. डॉ.आडके यांचे शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशाला, सोलापूर येथून व संपूर्ण वैद्यकीय शिक्षण डॉ. वैशंपायन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातून झाले आहे. त्यांना नेत्ररोगतज्ञ या विषयात पदवी परीक्षेत सुवर्णपदक मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी जगप्रसिद्ध अरविंद आय हॉस्पिटल ,मदुराई येथून लहान मुलांच्या डोळ्यांचे व तिरळेपणाचे सुपर स्पेशलायझेशन १९९१ ला केलेले आहे व ते महाराष्ट्र ,कर्नाटक व गोवा या तीन राज्यातील लहान मुलांच्या डोळ्यांच्या विकारावरील पहिले नेत्ररोगतज्ञ ठरलेले आहेत. डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ,नवी दिल्ली मास्टर ऑफ चीरुजरी एम सी एच, अमेरिका व इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आपथ्यालमोलॉजी, स्वित्झर्लंड अशा अत्यंत मानाच्या पदव्या त्यांनी संपादित केलेल्या आहेत. त्यांनी अतिशय अवघड अशा डोळ्यांवरील अनेक शस्त्रक्रिया कौशल्याने पार पाडलेल्या आहेत. त्यांना लहानपणापासूनच गरीब रुग्णांविषयी फार आत्मीयता असल्याने व आडके कुटुंबामधील अन्य विषयातील १२ डॉक्टर सदस्यांच्या आडके फाउंडेशनतर्फे आडके हॉस्पिटल या ठिकाणी गेली
तीस वर्षे दर शनिवारी मोफत रुग्णसेवा व माफक दरात शस्त्रक्रियेद्वारे हजारो गरीब व गरजू रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा दिलेली आहे. आडके फाउंडेशन तर्फे अस्थिरोग, बालरोग अशा विकारांवरील गरीब रुग्णांवर अत्यंत सवलतीच्या दरात उपचार केले जातात व इतर समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. डॉ. संतोष आडके यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा हॉस्पिटल येथे स्वतः पुढाकार घेऊन सर्वप्रथम नवीन नेत्ररोग विभाग चालू केला आहे व त्या ठिकाणी मागील पंधरा वर्षे मानद नेत्ररोग पदावर कार्य करून शेकडो रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून दिलेल्या आहेत. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व कंकुबाई नेत्र रुग्णालय, सोलापूर या ठिकाणीही गरीब रुग्णांसाठी मोफत सेवा प्रदान केलेली आहे. त्यांनी सोलापूर व भारतात नेत्र रुग्णांसाठी असंख्य मोफत शिबिरांमध्ये आपले योगदान दिलेले आहे. त्यासाठी त्यांना स्पेस फाउंडेशनचा मानाचा 'स्टार ऑफ द फाउंडेशन' व 'बसवरत्न' व इतर अनेक पुरस्कार आजतागायत प्रदान करण्यात आलेले आहेत.
त्यांच्या या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी बहुमोल उपयोग होणार आहे. त्यांच्ये मार्गदर्शन घेऊन या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.त्यासाठी त्यांना आडके हॉस्पिटल , सिव्हिल हॉस्पिटल शेजारी, सोलापूर या ठिकाणी भेटून मदत घेऊ शकता असे आवाहन डॉ. संतोष आडके यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
सदर पत्रकार परिषदेस डॉ.सुनील घाटे ,माजी अधिष्ठाता ,डॉ. व्ही एम मेडिकल कॉलेज , डॉ.संदीप आडके व स्पेस-७९ फाउंडेशन ,सोलापूरचे प्रभाकर जमखंडीकर,शिरीष दंतकाळे, इंजिनीयर बसवराज आवटे ,नागनाथ हालकुडे ,अंबादास बासुदकर ,सुभाष गवळी इतर मान्यवर उपस्थित होते.