महाराष्ट्र शासनाने दिली मान्यता ; राहुल कौलगे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगत्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाचे गाव असून गावात लाखो वारकरी येत असतात. त्यामुळे गावातील नागरिकांसह भाविकांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे असणारे आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल कौलगे पाटील यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे त्यास आता यश मिळाले असून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने शासन निर्णय दिनांक 28 फेबु्रवारी 2024 रोजी काढण्यात आला असून त्यात पिराची कुरोली येथे नवीन आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी माहिती राहुल कौलगे पाटील यांनी दिली.
राज्यात महायुतीचे सरकार असताना शिवसेनेचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांच्याकडे प्रथम या आरोग्य उपकेंद्राबाबत मागणी करण्यात आली होती त्यावेळी खा.राहुल शेवाळे, विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या सहकार्याने पाठपुरावा चालू होता. त्यावेळी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणेसाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव हा फेर सादर करण्यात आला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर फाईल माघारी आली मात्र तरीही राहुल कौलगे पाटील यांनी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे सदरच्या प्रश्नाबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी खास बाब म्हणून पिराची कुरोली आरोग्य उपकेंद्र मंजूर होण्यास शिफारस केली त्यास अखेर मान्यता मिळाली असून आता नवीन आरोग्य उपकेंद्रास स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे पिराची कुरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी राहुल कौलगे पाटील यांचे आभार मानले.
आ.नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्या शिफारसीवरून प्रश्न मार्गी लागला
पिराची कुरोली येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी अनेक नेत्यांनी विशेषत: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे थेट पत्राद्वारे शिफारस केली त्यामुळे सदरचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे कॉंग्रेसच्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल कौलगे पाटील यांनी दिली.