सोलापूर प्रतिनिधी
यात वाळूचोरी प्रकरणी आरोपी नामे राजकुमार बुचन्ना गायकवाड रा. टाकळी, जि सोलापूर तसेच विजयानंद पांडुरंग घाडगे रा. सोलापूर यांची वाळूचोरी करून त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डी. आर. भोला यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी कि दि १७/११/२०१३ रोजी तत्कालीन तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे याना बातमीदारां मार्फत गुप्त माहिती मिळाली कि नांदणी येथून एक ट्रक अनधिकृत चोरीची वाळू भरून घेऊन नांदणी, तेरामैल मार्गे सोलापूर येथे येत आहे. त्याप्रमाणे तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या दुचाकीवर नांदणी ते सोलापूर असा त्या संशयित ट्रकचा पाठलाग केला व अंतिमतः तो ट्रक सोलापूर शहरामध्ये चाटला साडी सेन्टर जवळ पकडला. त्यावेळीस त्यांनी लागलीच त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांना पुढील कारवाईसाठी बोलावून घेतले तसेच त्या ट्रकचालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजू गायकवाड असे सांगितले व सदरचा ट्रक महसूल खात्यातील विजय घाडगे यांचा आहे असेही सांगितले. त्याप्रमाणे श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन मध्ये सदर दोंघांविरुद्ध फिर्याद दिली व लागलीच दोघांना ही अटक करण्यात आली. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी (तत्कालीन तहसीलदार), महसूल खात्याचे कर्मचारी व सदर केस चे तपासाधिकारी. सदर सरकार पक्षातर्फे सहआरोपी ने दिलेला कबुलीजबाब हा महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला पण आरोपी पक्षातर्फे अनेक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्याचा आधार घेत सदरचा मुद्दा खोडून काढण्यात आला तसेच सगळ्याच महसूल अधिकाऱ्यांची आरोपीच्या वकिलांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली.
आरोपीतर्फे अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले त्यापैकी एक म्हणजे सहआरोपीचा कबुलीजबाब भारतीय पुरावा कायद्यानुसार फार थोड्या अंशी ग्राह्य धरला जाऊ शकतो फक्त अश्या कबुलीजबाबावरती आरोपीस शिक्षा ठोठावता येत नाही. तसेच आरोपीतांचे मोबाइल लोकेशन चा तपास करून गुगल लोकेशन रिपोर्ट दाखल करणे अपेक्षित होते पण ते मुद्दामहून दाखल करण्यात आलेले नाही. सदर बाबींचा विचार करून मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री डी. आर. भोला यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली .
यात आरोपीतर्फे अँड. अभिजित इटकर, अँड. दिलीप जगताप, अँड. गौरांग काकडे, अँड. संतोष आवळे, अँड. फय्याज शेख, अँड. शिवाजी कांबळे , अँड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.