मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
"वारकरी ही मराठी साहित्य संस्कृतीची मुख्य धारा असून संतांनी पाहिलेले अध्यात्मिक समतेचे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. मराठी साहित्यात ग्रामीण स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाचे चित्रण फारसे उमटलेले नाही. संस्कृती आणि व्यवस्थापन घडविणाऱ्या स्त्रिया साहित्याच्या प्रांतात मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या जात आहेत. पद आणि अधिकारापेक्षा माणूस म्हणून आपण संवेदनशीलता जपतो का, हे महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य साहित्यिक प्रदीप पाटील यांनी केले.
ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौदाव्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी उपस्थित आमचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले, तर प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी साहित्यिक बाळासाहेब कांबळे लिखित 'असे घडले महापुरुष' पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
उद्घाटक म्हणून बोलताना मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधाकर कुबेर म्हणाले,"साहित्य हा विचारांचा व भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. त्यामुळे साहित्यात ग्रामीण-शहरी असा भेद करता येणार नाही."
दुसऱ्या सत्रात कथाकार अॅड. सतीश लोखंडे यांचे बहारदार कथाकथन झाले, तर तिसऱ्या सत्रात कवी आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन किरण भिंगारदिवे यांनी केले.
यामध्ये शाहीर नारायण कदम(धोंडेवाडी), अॅड. शुभदा कुलकर्णी (वडूज) , रंजना सानप (मायणी), प्रदीपकुमार भांदिर्गे (मोराळे), डॉ. हेमांगिनी माने (विटा), अंजली गरवारे (मायणी), प्रकाश भोंगाळे (मायणी), वंदना लिपारे (मायणी), प्रकाश शिंदे (विटा), सीमा मंगरुळे-तवटे (वडूज), प्रा रूपाली राऊत (वडूज), चंद्रकांत हुलगे (गारळेवाडी), दीपक पवार (बलवडी) आदी मान्यवरांनी कविता सादर केल्या.
संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी व डॉ. विजया कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. लक्ष्मण जठार व डॉ. विलास बोदगिरे यांनी केले. यावेळी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एन. व्ही. कुबेर, ए. टी. पुस्तके, दिगंबर पिटके आदी मान्यवर उपस्थित होते .संमेलनामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व रसिक यांची मोठी उपस्थिती होती.